जळगाव -जिल्ह्यात गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे, एरंडोल, पाचोरा, रावेर, चाळीसगाव, भुसावळ या पाच तालुक्यात सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. प्राथमिक अहवाल नुसार 4 हजार 268.97 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून यामध्ये सर्वाधिक 1 हजार 615 हेक्टरवरील कापूस पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वच पिकांचे नुकसान 33 टक्यांच्यावर आहे. सर्वाधिक फटका एरंडोल तालुक्यात 2 हजार 423 हेक्टरवरील पिकांना बसला आहे. जिल्ह्यात पिकांचे पंचनामे सुरू असून त्यानंतर सविस्तर अहवाल येऊन आकडेवारी स्पष्ट होणार आहे.
आपल्या व्यथा मांडताना शेतकरी सततच्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यात यंदाही दुष्काळाचे संकट उभे ठाकले आहे. पाऊस सुरू राहीला तर हाती काहीच लागणार नाही अशी भिती शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका पांढरे सोने असलेल्या कपाशीला बसू लागला आहे. कपाशीच्या कैऱ्या काळ्या पडून गळू लागल्या आहेत. त्यामुळे यंदाही कपाशीच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट येण्याची भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, जिल्ह्यात उडीद, मूग या पिकांना जबर फटका बसला. कपाशी, ज्वारी, बाजरी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अति पावसामुळे सलग दुसऱ्या वर्षीही शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर निसर्गाने नांगर फिरविल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला असला तरी गावागावात नुकसानीचे भयावह चित्र समोर येत आहे.
यंदाही कापसाला फटका
गेल्या वर्षीही परतीच्या पावसाने दिवाळीपर्यंत हाहाकार माजवला होता. त्यामुळे गेल्या वर्षी ज्वारी, बाजरी, कापूस, मका या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. तीच परिस्थिती पुन्हा दुसऱ्या वर्षीही उद्भवली असून गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे पिकांना मोठा फटका बसत आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही सर्वाधिक कपाशीचे नुकसान झाल आहे.
जिल्ह्यातील 5 तालुक्यात सर्वाधिक नुकसान
मागील आठवड्यात जोरदार पाऊस व वाऱ्यामुळे जिल्ह्यातील पाच तालुक्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. यामध्ये सर्वाधिक फटका एरंडोल तालुक्याला बसला आहे. या तालुक्यातील 2 हजार 423 हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. त्या खालोखाल रावेर तालुक्यात 1 हजार 125.87 हेक्टर, पाचोरा तालुक्यातील 678.40 हेक्टर, चाळीसगाव तालुक्यातील 29.60 हेक्टर तर भुसावळ तालुक्यातील 12.10 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या पाचही तालुक्यांमधील सुमारे 66 गावांमधील 5 हजार 442 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षी देखील जिल्ह्यातील 1 हजार 615 हेक्टरवरील कापसाला फटका बसला आहे. एरंडोल तालुक्यात सर्वाधिक 1 हजार 201 हेक्टरवरील कापसाचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात कापसाप्रमाणेच ज्वारी 583.85 हेक्टर, इतर पिके 481 हेक्टर, लिंबू 480 हेक्टर, केळी 459.82 हेक्टर, मका 291.20 हेक्टर, फळपिके 187 हेक्टर, सोयाबीन 78 हेक्टर, पपई 52 हेक्टर तर कडधान्य वर्गीय पिकांचे सुमारे 50 ते 55 हेक्टरवर नुकसान झाले आहे.
कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा कृषी विभागाने प्राथमिक अहवाल तयार केला आहे. या अहवालात जिल्ह्यातील नुकसानग्रस्त क्षेत्राचा आकडा कमी दिसत असला, तरी गेल्या आठवडाभरात झालेल्या पावसामुळे नुकसान वाढले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. मागील महिन्यात अतिवृष्टी झाल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी केलेल्या प्राथमिक पाहणीचा अहवाल कृषी विभागाने जाहीर केला आहे.
हेही वाचा -'सीबीआय'वर माध्यमांकरवी दबाव आणणे चुकीचे - उज्ज्वल निकम