महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलीस भरतीच्या परीक्षेत स्मार्ट कॉपी करणाऱ्या 2 'मुन्नाभाईं'वर गुन्हा; एकाने परीक्षा केंद्रात नेला मोबाईल तर दुसऱ्याने ब्लुटूथ! - police bharati froud

आज (रविवारी) लेखी परीक्षेचा निकाल दुपारी अडीच वाजेपर्यंत जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. उमेदवारांच्या मोबाईलवरही निकाल येईल. मे. न्यासा कम्युनिकेशन कंपनीला या परीक्षेसाठी वेंडर म्हणून नेमण्यात आले होते.

जळगाव पोलीस
जळगाव पोलीस

By

Published : Oct 10, 2021, 11:16 AM IST

Updated : Oct 10, 2021, 3:49 PM IST

जळगाव- हिंदी चित्रपट अभिनेता संजय दत्तने आपल्या 'मुन्नाभाई एमबीबीएस' या चित्रपटात परीक्षा देताना स्मार्ट कॉपी केल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहे. असाच काहीसा प्रकार जळगाव पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेत घडला आहे. पोलीस भरतीसाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत दोन बहाद्दरांनी संजय दत्तसारखी स्मार्ट कॉपी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना स्मार्टनेस जमला नाही. पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने हेरल्यामुळे दोघेही सापडले. योगेश रामदास आव्हाड (रा. पांझणदेव, पो. नागपूर, ता. नांदगाव, जि. नाशिक) व प्रतापसिंग गुलचंद बालोद (रा. वैजापूर, ता. औरंगाबाद) अशी कॉपी करणाऱ्या दोघांची नावे असून, त्यांच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

स्मार्ट कॉपी करणाऱ्या 2 'मुन्नाभाईं'वर गुन्हा

परीक्षा केंद्रात आणला मोबाईल, मित्राला व्हाट्सएपवर पाठवली प्रश्नपत्रिका!

नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी कॉलेज या परीक्षा केंद्रावर योगेश रामदास आव्हाड याने केंद्राच्या आवारातील सीसीटीव्ही व्हिडिओ कॅमेरे तसेच तपासणी करणाऱ्या पोलिसांची नजर चुकवून मोबाइल परीक्षा केंद्रात नेला होता. प्रश्नपत्रिका मिळताच त्याने प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून मित्राच्या मोबाईलवर पाठवले. त्यानंतर मित्राने प्रश्नांची उत्तरे आव्हाडला पाठवली. त्यानुसार आव्हाड प्रश्नपत्रिका सोडवत होता. हा प्रकार सहायक पोलीस निरीक्षक देवरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्याला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर आव्हाड व त्याच्या मित्र या दोघांवर धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसऱ्याने कानात लपवले ब्लुटूथ -

विवेकानंद प्रतिष्ठानच्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रतापसिंग गुलचंद बालोद याने एटीएमच्या आकाराचे एक डिव्हाइस सोबत आणले होते. त्यात मेमरी कार्ड होते. ते ब्लूटूथने कनेक्ट करून स्पीकरमधून आवाज दिला होता. लहान आकाराचा स्पीकर त्याने कानात लपवला होता. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीचे नाव त्याला ऐकू येईल अशी व्यवस्था केली होती. प्रतापसिंग हा परीक्षा केंद्रावर आला तेव्हा त्याने बनियनमध्ये डिव्हाइस लपवले होते. पण परीक्षा केंद्राच्या आत जाण्याआधीच त्याचा हा प्रकार उघडकीस आला. त्याच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

जळगाव पोलीस

128 पदांसाठी घेण्यात आली लेखी परीक्षा -

जळगाव पोलीस दलात 128 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यात शनिवारी (9 ऑक्टोबर) दुपारी जळगाव व भुसावळ येथे विविध केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात आली. 21 हजार 690 उमेदवारांपैकी 11 हजार 536 उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यात नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी कॉलेज व विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल येथील परीक्षा केंद्रावर घडलेल्या कॉपीच्या प्रकाराव्यतिरिक्त अन्यत्र परीक्षा सुरळीतपणे पार पडली.

आज दुपारी जाहीर होणार परीक्षेचा निकाल-

आज (रविवारी) लेखी परीक्षेचा निकाल दुपारी अडीच वाजेपर्यंत जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. उमेदवारांच्या मोबाईलवरही निकाल येईल. मे. न्यासा कम्युनिकेशन कंपनीला या परीक्षेसाठी वेंडर म्हणून नेमण्यात आले होते.

Last Updated : Oct 10, 2021, 3:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details