जळगाव- अमळनेर तालुक्यातील मंगरूळ गावाने पाणी फाउंडेशनच्या 'वॉटर कप' स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे गावातील शेतशिवारात सध्या श्रमदान सुरू आहे. या महाश्रमदानात रविवारी भरत आणि नूतन या नवदाम्पत्याने स्वेच्छेने सहभाग घेत सामाजिक कार्याला हातभार लावला. त्यामुळे या जोडप्याचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.
अख्खा महाराष्ट्र्र दुष्काळाने होरपळून निघाला आहे. दुष्काळावर मात करायची असेल तर जलसंधारणाची कामे करण्यावाचून पर्याय नाही. हीच बाब लक्षात घेऊन अभिनेता आमीर खानच्या पुढाकाराने स्थापन झालेले पाणी फाउंडेशन गावागावात श्रमदान करुन जलसंधारणाचे काम करत आहे. तर या उपक्रमाला नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे.
जळगाव: दुष्काळाशी दोन हात, लग्नापूर्वी नवदाम्पत्याने केले श्रमदान दुष्काळग्रस्त भागात मोडणारे मंगरूळ हे सुमारे 12 हजार लोकसंख्येचे गाव आहे. या गावात गेल्या 25 ते 30 वर्षांपासून पाणीटंचाई भासत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी ग्रामस्थांनी आता एकत्र मोट बांधली आहे. दुष्काळाला हद्दपार करण्याचा विडा ग्रामस्थांनी उचलला असून प्रत्येक जण आपापल्यापरीने या सामाजिक कार्यात वाटा उचलत आहे. सध्या या गावाच्या शिवारात शेतबांध बंदिस्ती, नाला खोलीकरण, ठिकठिकाणी समतल चर खोदणे, रोपवाटिका निर्मिती, अशी कामे सुरू आहेत.
गेल्या २ दिवसांपासून या गावात वॉटर कप स्पर्धेसाठी महाश्रमदान सुरू आहे. या ठिकाणी रविवारी सकाळी भरत पाटील व नूतन भदाणे या नवीन नवरा-नवरीने लग्न होण्यापुर्वी श्रमदान करुन सामाजिक कार्याला हातभार लावला आहे.