जळगाव -पत्नीच्या मृत्यूनंतर रेल्वेखाली तरुणाने आत्महत्या केल्याच्या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. मुलीच्या पतीने तिचा खून केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. प्रमोद तुकाराम शेटे (वय ३२) व कांचन प्रमोद शेटे (वय २५, रा. कांचननगर) असे मृत दाम्पत्याची नावे आहेत.
प्रमोद याचा ५ वर्षांपूर्वी कांचन हिच्यासोबत प्रेमविवाह झालेला होता. या दाम्पत्यास गिरीषा (वय दीड वर्ष) व हिरन (वय ३) या दोन मुली आहेत. प्रमोदच्या आई-वडिलांचे ३० वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. तो कांचननरात आजी-आजोबांकडे राहत होता. याच परिसरात राहणाऱ्या कांचनसोबत प्रेमविवाह केल्यानंतर तो पत्नीसह सासुरवाडीजवळच भाड्याने खोली घेऊन राहत होता. प्रमोद हा एका मोबाईल कंपनीत काम करत होता. तर कांचन गृहिणी होती. दरम्यान, कांचनचे वडील राजेंद्र विश्वनाथ वाणी यांनी केलेल्या आरोपांनुसार प्रमोद याला दारू व सट्टा खेळण्याचे व्यसन जडले होते. त्यामुळे तो सतत पत्नीसोबत भांडण करायचा. तिला मारहाण करत असायचा. व्यसनामुळे त्याच्यावर कर्जदेखील झाले होते.
विवाहितेची हत्या झाल्याचा माहेरच्या लोकांचा आरोप मुलीला रुग्णालयात नेण्यावरून वाद-
दोन महिन्यांपूर्वीच त्याचे कर्ज फेडण्यासाठी ३० हजार रुपये दिले होते. भाऊबीजेच्या दिवशी कांचन दुपारी माहेरी आली होती. लहान भाऊ जयेश याला ओवाळल्यानंतर प्रमोद याने तिला परत घरी बोलावून घेतले होते. यानंतर प्रमोद व कांचन हे आजीकडे जेवण करुन रात्री १० वाजता घरी गेले. यांनतर दोघांमध्ये वाद झाला. लहान मुलगी गिरीषा आजारी असल्यामुळे तिला रुग्णालयात नेण्यावरुन हा वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रमाेद याने पैसे नसल्याचे कारण सांगत मुलीस रुग्णालयात नेले नाही. यातून वाद झाल्यानंतर प्रमाेदने पत्नीचा खून केला, असा आरोप मृत कांचनचे वडील राजेंद्र वाणी यांनी केला आहे.
पप्पांनी आईला केली मारहाण, तीन वर्षांच्या मुलीने दिली माहिती-
साेमवारी पहाटे प्रमोदने एका मित्रास व्हाईस मॅसेजकरुन निरोप दिला. 'पत्नीचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे मीदेखील आत्महत्या करतो आहे', असा संदेश त्याने दिला होता. हा संदेश पाहून सकाळी साडेसात वाजता प्रमोदचा मित्र त्याच्या सासुरवाडीत गेला. त्याने संदेश ऐकवल्यानंतर कांचनची आई सुरेखा वाणी यांनी प्रमोदचे घर गाठले. घराच्या दरवाज्याचा बाहेरुन कडी-कोयंडा बंद होता. पलंगावर कांचन निपचित अवस्थेत पडलेली होती. तर दोन्ही मुली तिच्या बाजुला झोपल्या होत्या. प्रमोद घरात नव्हता. कांचनला उठवण्याचा प्रयत्न केला असता ती बेशुद्ध असल्याचे निष्पन्न झाले. सुरेखा यांनी लहान मुलींना झोपेतून उठवले. 'पप्पांनी रात्री मम्मीला मारहाण केली होती', असे हिरणने सुरेखा वाणी यांना सांगितले. यानंतर वाणी कुटुंबीयांनी कांचनला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
शनिपेठ पोलिसांची घटनास्थळी धाव-
शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल ससे, पोलीस कर्मचारी रवींद्र पाटील, अमोल विसपुते, सलीम पिंजारी, संजय शेलार, मनोज इंद्रेकर व किरण वानखेडे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, कांचनचा खून झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे तिच्या मृत्यूचे कारण उलगडण्यासाठी व्हिसेरा राखीव ठेवण्यात आल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी सांगितले.