जळगाव - 'देशात रासायनिक खतांचा मुबलक साठा आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे पुरवठ्याची साखळी विस्कळीत झाली आहे. राज्यांनी त्यात सुसूत्रता न आणल्यास खतांचा काळाबाजार होईल, याबाबत गाफील राहू नका' असा इशारा केंद्र शासनाने दिला होता. यानंतर जळगाव जिल्हा प्रशासनाने तत्काळ पाऊले उचलली. त्याच्या परिणामस्वरुप आज जिल्ह्यात लॉकडाऊन असतानाही खते आणि बियाण्यांची मुबलक प्रमाणात उपलब्धता असल्याचे दिसत आहे.
खरीप हंगाम 2020 साठी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने खते आणि बियाण्यांची जेवढी मागणी नोंदवली कृषी आयुक्तालयाकडे नोंदवली आहे, तेवढा साठा मंजूर झाला आहे. कोरोनाची पार्श्वभूमी असताना जिल्ह्यात कोणत्याही परिस्थितीत खते व बियाणांची कमतरता भासणार नाही, अशी माहिती कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी दिली आहे.
जिल्ह्यात दरवर्षी सुमारे साडेसात लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाची लागवड होते. त्यात प्रमुख नगदी पीक असलेला कापूस 5 ते साडेपाच लाख हेक्टर, ज्वारी, बाजरी, मका यासारखी तृणधान्ये दीड ते 2 लाख हेक्टर, भुईमूग, सोयाबीन 30 ते 35 हजार हेक्टर त्याचप्रमाणे इतर पिकांची 25 ते 30 हजार हेक्टरवर लागवड होते. दरवर्षी जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांची होणारी लागवड लक्षात घेता जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून कृषी आयुक्तालयाकडे खते व बियाण्यांची मागणी नोंदवली जाते. ही मागणी नोंदवताना गेल्या 3 वर्षातील सरासरी विचारात घेतली जाते.
हेही वाचा...ईटीव्ही भारत विशेष : कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष विस्कळीत; विद्यार्थी, प्रशिक्षित तरुण आणि पालकांवर होणार परिणाम
बियाण्यांचा मंजूर साठा :
- कापूस (बीजी 2 आणि नॉन बीटी) : 25 लाख 52 हजार पाकिटे
- ज्वारी : 4 हजार 496 क्विंटल
- बाजरी : 600 क्विंटल
- मका : 10 हजार क्विंटल
- सोयाबीन : 7 हजार क्विंटल
- तूर : 1 हजार 40 क्विंटल
- मूग : 2 हजार क्विंटल
- उडीद : 2 हजार 575 क्विंटल
खतांचा मंजूर साठा :
खरीप हंगाम 2020 साठी जळगाव जिल्ह्यासाठी सर्व खते मिळून 3 लाख 40 हजार मेट्रीक टन एवढी मागणी नोंदविण्यात आली होती. त्यापैकी कृषी आयुक्तालयाकडून 3 लाख 20 हजार मेट्रीक टन एवढा साठा मंजूर झाला आहे. त्यात युरिया 1 लाख 11 हजार मेट्रीक टन, डीएपी 12 हजार 690 मेट्रीक टन, संयुक्त खते 72 हजार 920 मेट्रीक टन व इतर खते 1 लाख 25 हजार मेट्रीक टन असा समावेश आहे.
हेही वाचा...ईटीव्ही भारत विशेष : राज्यातील आंबा आणि मच्छिमारी व्यवसाय संकटात
खते ऐआणि बियाणे ही अत्यावश्यक वस्तू यादीतील बाब आहेत. साधारण एप्रिल-मे नंतर शेतकरी खते आणि बियाण्यांची खरेदी करतात. उत्पादन चांगले मिळावे, यासाठी शेतकरी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. मात्र, यावर्षी कोरोना आणि लॉकडाऊन यांमुळे खते आणि बियाणांची उपलब्धता होताना विविध अडचणी येऊ शकतात. याच पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा प्रशासनाने खते आणि बियाणांचा मुबलक साठा केल्यास ही बाब नक्कीच दिलासादायक आहे.