जळगाव - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दहापेक्षा जास्त जणांना प्रवेश न देणे, तसेच टप्प्याटप्प्याने व्यवहार करण्याचे आदेश आहे. असे असतानाही कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन होत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे जिल्ह्यातील जळगाव, अमळनेर, भुसावळ व चाळीसगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे व्यवहार पुढील आदेश येईपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांतर्गत बाजार समित्यांमधील गर्दी कमी व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी २० मार्च रोजी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये एका वेळी दहा जणांपेक्षा जास्त जणांना प्रवेश नसावा. टप्प्या-टप्प्याने व्यवहार करण्याचे आदेश दिले होते. मात्र. असे असताना बाजार समित्यांमध्ये दररोज मोठी गर्दी होत होती. शिवाय या ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे पालनही होत नसल्याचे समोर आले होते.