महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाचा फटका : जळगावात आवक मंदावल्याने भाजीपाला कडाडला - Vegetable prices increased

शनिवारपर्यंत 25 ते 30 रुपये किलोने मिळणारा भाजीपाला मंगळवारी 70 ते 80 रुपये किलोने विक्री होत असल्याचे भाजीबाजारात दिसून आले. हीच परिस्थिती अजून काही दिवस राहिल्यास गृहिणींचे बजेट कोलमडणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहेत.

Vegetable Market Jalgaon
भाजीमार्केट जळगाव

By

Published : Mar 24, 2020, 3:03 PM IST

जळगाव - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच वाहतूक व्यवस्थाही बंद असल्यामुळे मंगळवारी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक केवळ 10 टक्‍के इतकीच झाली. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपालाच नसल्याने भाव गगनाला भिडले होते. भाजीपाला कडाडल्याने सर्वसामान्य लोकांच्या खिशाला झळ पोहोचणार असून गृहिणींचे देखील बजेट कोलमडणार आहे.

जळगावात आवक मंदावल्याने भाजीपाल्यांचे भाव वाढले...

'जनता कर्फ्यू'मुळे रविवारी शेतकरी शेतात गेला नाही, तसेच खासगी वाहने देखील बंद असल्याने जिल्हाभरातून येणारा भाजीपाला कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आला नाही. दररोजच्या तुलनेत कृषी उत्पन्न बाजारपेठेत केवळ मोजकाच भाजीपाला शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणल्याने मंगळवारी सकाळपासून भाजीपाला चढ्या भावाने विकला जात होता. रोजच्या तुलनेत भाजीपाल्याची आवक केवळ 10 टक्‍क्‍यांवर होती. त्यामुळे मोजकाच भाजीपाला बाजारात विक्रीसाठी आला होता. या संधीचा फायदा घेत आडत्यांनी विक्रेत्यांना भाजीपाला चढ्याभावाने विक्री केला. त्यामुळे विक्रेत्यांना नाइलाजास्तव भाजीपाला अधिक भावाने विकावा लागला.

हेही वाचा...कोरोना इफेक्ट : राज्यसभा निवडणुका पुढे ढकलल्या

गृहिणींचे 'बजेट' कोलमडणार :

शनिवारपर्यंत 25 ते 30 रुपये किलोने मिळणारा भाजीपाला मंगळवारी 70 ते 80 रुपये किलोने विक्री होत असल्याचे भाजीबाजारात दिसून आले. हीच परिस्थिती अजून काही दिवस राहिल्यास गृहिणींचे बजेट कोलमडणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे.

असे आहेत भाजीपाल्याचे दर (किलोमध्ये)

कोथिंबीर - 70 रुपये
मिरची - 80 रुपये
फ्लॉवर - 50 रुपये
टोमॅटो - 40 रुपये
मेथी - 20 रुपये जुडी
वांगे - 30 रुपये
वाल - 80 रुपये
गवार - 70 रुपये
भेंडी - 80 रुपये

ABOUT THE AUTHOR

...view details