जळगाव -कोरोनाच्या लसींचा साठा संपल्याने जळगाव जिल्ह्यातील बहुतांश केंद्रांवर पुन्हा एकदा लसीकरणाची प्रक्रिया ठप्प झाली आहे. लसीकरण थांबण्याची ही महिनाभरातील दुसरी वेळ आहे. सोमवारी जळगाव महापालिका कार्यक्षेत्रातील अनेक लसीकरण केंद्रांवरून नागरिकांना लस न घेताच परत जाण्याची वेळ आली. त्यामुळे अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एकीकडे राज्य शासन लसीकरणाची टक्केवारी वाढवण्याचे आवाहन करत असताना दुसरीकडे अशा प्रकारे नागरिकांना लसीपासून वंचित राहावे लागत असल्याची शोकांतिका आहे.
जळगाव जिल्ह्यात दुसऱ्यांदा लसीकरणाची प्रक्रिया ठप्प, लसींचा साठा संपल्याने उद्भवली अडचण - जळगाव कोरोना लसीकरण
कोरोनाच्या लसींचा साठा संपल्याने जळगाव जिल्ह्यातील बहुतांश केंद्रांवर पुन्हा एकदा लसीकरणाची प्रक्रिया ठप्प झाली आहे. लसीकरण थांबण्याची ही महिनाभरातील दुसरी वेळ आहे. सोमवारी जळगाव महापालिका कार्यक्षेत्रातील अनेक लसीकरण केंद्रांवरून नागरिकांना लस न घेताच परत जाण्याची वेळ आली. त्यामुळे अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
आता साडेनऊ हजार डोस मिळणार -
गेल्या आठवड्यात जिल्ह्यासाठी ४० हजार डोस प्राप्त झाले होते. त्यानंतर जिल्ह्यातील सर्वच १३३ केंद्रांवर लसीकरण सुरू झाले होते. मात्र, अवघ्या ४ ते ५ दिवसातच काही केंद्रांवरील हे डोस संपल्याने त्या ठिकाणचे लसीकरण बंद आहे. ज्या केंद्रांवर डोस उपलब्ध आहेत, त्याच केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसात जिल्ह्यासाठी कोविशिल्ड व को-व्हॅक्सिन लसीचे ९ हजार ४२० डोस प्राप्त होणार आहेत. ज्या केंद्रांवर डोस नाहीत. त्या केंद्रांवर मागणीनुसार हे डोस दिले जाणार आहे. जिल्ह्यात लसीकरणाने वेग पकडला असून ४५ वर्षांवरील नागरिकांचा लसीकरणाला प्रतिसाद मिळत आहे. असे असताना लसींचा अपेक्षित पुरवठा होत नसल्याने टक्केवारीवर परिणाम झाला आहे.