जळगाव - राज्य शासनाच्या वतीने आज शुक्रवारी राज्यभर कोरोना लसीकरणाचा ड्रायरन होत आहे. जळगाव जिल्ह्यात देखील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासह चार ठिकाणी ही ड्रायरन होणार असून, त्यासाठी आरोग्य यंत्रणेने पूर्वतयारी केली होती. सकाळी 9 वाजेनंतर ड्रायरनला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. ती 11 वाजेपर्यंत चालणार आहे. या ड्रायरनच्या माध्यमातून कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला जाणार आहे.
जिल्हा शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात नर्सिंग महाविद्यालयाच्या इमारतीत ड्रायरनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, जळगावातील शिवाजीनगरातील महापालिका प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र धामणगाव आणि जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात ही ड्रायरन होणार आहे.
म्हणून होतेय ड्रायरनकोरोना लस कोणत्याही क्षणी भारतात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहीम राबविण्यासाठी राज्य सज्ज झाले आहे. लसीकरण मोहीम योग्य प्रकारे पार पडावी, यासाठी ड्राय रन घेतली जात आहे. कोरोना लसीकरणाबतचे नियोजन, अंमलबजावणी तसेच अहवाल तयार करणे, या सर्व बाबींची पडताळणी, तपासणी, प्रत्यक्ष लसीकरण सुरू करण्यापूर्वी, लसीकरणाबाबतची आव्हाने व त्यानुसार मार्गदर्शक सूचना तयार करणे, लसीकरण मोहिमेतील सर्व स्तरावरील अधिकारी तसेच कर्मचारी यांचा आत्मविश्वास वाढविणे यासाठी ही ड्रायरन महत्त्वपूर्ण असणार आहे.
लाभार्थ्यांना लसीकरण
ड्रायरनच्या चाचणीत लाभार्थ्यांचे निरीक्षण करून एका केंद्रावर 25 लाभार्थ्यांना लसीकरण केले जाईल. लाभार्थ्यांना त्यांच्या कोविन अॅपवरील नोंदणीनुसार कक्षात सोडले जाईल. त्यानंतर कोविन अॅप्लिकेशनमध्ये लाभार्थ्यांच्या माहितीची पडताळणी केल्यानंतर लसीकरणाची माहितीची नोंद कोविन ॲपमध्ये करण्यात येईल.
हेही वाचा -राज्यात आज कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा ड्रायरन; ३० जिल्ह्यात मोहीम