जळगाव -जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा (कोविड रुग्णालय) भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. यापूर्वी पॉझिटिव्ह रुग्ण कक्षातून बाहेर पडणे, अहवाल येण्यापूर्वीच रुग्णांना डिस्चार्ज देणे असे प्रकार घडलेले आहेत. अशातच भुसावळ येथील कोरोना पॉझिटिव्ह असलेली ८५ वर्षीय वृद्ध महिला मागील चार दिवसांपासून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत वृद्धा हरविल्याची तक्रार केल्याने कोविड रुग्णालयातील ही धक्कादायक घटना समोर आली आहे.
कोविड रुग्णालयाचा भोंगळ कारभार, भुसावळची ८५ वर्षीय पॉझिटिव्ह वृद्धा बेपत्ता - जळगाव कोरोना अपडटे बातमी
भुसावळ येथील ८५ वर्षीय महिलेचा कोरोना चाचणी अहवाल १ जूनला पॉझिटिव्ह आला होता. त्याच दिवशी या महिलेस जळगाव कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, गेल्या चार दिवसांपासून ही महिला बेपत्ता आहे. तिच्या कुटुंबीयांना याची माहिती झाल्यानंतर त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात वृद्धा हरविल्याची नोंद केली आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १०५० कोरोनाबाधित आढळून आले आहेत. एकीकडे कोरोना संसर्ग रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत असतानाच दुसरीकडे जळगाव कोविड रुग्णालयातील ढिसाळ कारभाराच्या नवनवीन घटना समोर येत आहेत. भुसावळ येथील ८५ वर्षीय महिलेचा कोरोना चाचणी अहवाल १ जूनला पॉझिटिव्ह आला होता. त्याच दिवशी या महिलेस जळगाव कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, गेल्या चार दिवसांपासून ही महिला बेपत्ता आहे. तिच्या कुटुंबीयांना याची माहिती झाल्यानंतर त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात वृद्धा हरविल्याची नोंद केली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा कोविड रुग्णालयाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलिसांनी कोविड रुग्णालयात येऊन वृद्धेला दाखल केलेल्या कक्षातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्याचा प्रयत्न केला. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे, तेथील सीसीटीव्ही देखील बंद असल्याचे उघड झाले. वृद्धा कक्षातून बाहेर कशी आली? तेथील डॉक्टर्स, नर्स आणि बाहेर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या नजरेस ती पडली नाही का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने जळगावातील नागरिक उपस्थित करीत आहेत.