जळगाव - जिल्हा रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराची प्रचिती आणणारी अजून एक धक्कादायक घटना शनिवारी समोर आलीय. कोरोना बाधित असलेली एक वृद्धा कोरोना वॉर्डातून बाहेर येऊन जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ निपचित अवस्थेत पडलेली होती. ही बाब काही लोकांच्या सतर्कतेमुळे समोर आल्यानंतर संबंधित वृद्धेला पुन्हा कोरोना वॉर्डात दाखल करण्यात आले. दरम्यान, या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. पॉझिटिव्ह असलेली वृद्धा रुग्णालयाबाहेर आलीच कशी? असा प्रश्न उपस्थित झाला असून, यंत्रणेविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे.
संबंधित वृद्धा ही जिल्ह्यातील एरंडोल शहरातील रहिवासी आहे. मागील आठवड्यात या वृद्धेच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे वृद्धेसह तिच्या कुटुंबीयांना क्वारंटाईन करण्यात आले होते. दरम्यान, या वृद्धेच्या कोरोना चाचणीचा अहवाल काल (शुक्रवारी) पॉझिटिव्ह आला. त्यामुळे तिच्यावर जिल्हा रुग्णालयातील कोरोना संसर्ग वॉर्डात उपचार सुरू होते. शनिवारी दुपारी ही वृद्धा कोरोना वॉर्डातून बाहेर आली. प्रकृती गंभीर असल्याने तिला व्यवस्थित चालता येत नव्हते. म्हणून ती रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पडून राहिली. ही बाब काही लोकांच्या निदर्शनास आली.
काहींनी चौकशी केल्याने वृद्धा एरंडोल येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. वृद्धेचा मोबाईलमध्ये फोटो काढून एरंडोल येथील काही लोकांकडून ओळख पटविण्यात आली. त्यात ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यानंतर काही लोकांनी घटनेचे गांभीर्य ओळखून रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यामुळे यंत्रणा हादरली. संबंधित वृद्धेला पुन्हा कोरोना वॉर्डात दाखल करण्यात आले. या प्रकाराबाबत जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आले नाही. चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देऊन वेळ मारून नेली. दरम्यान, एक कोरोना बाधित वृद्धा अशा पद्धतीने रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर पडून असते, यावरून जिल्हा रुग्णालयात किती भोंगळ कारभार सुरु आहे, याची प्रचिती येत आहे. कोरोना बाधित रुग्ण अशा पद्धतीने बाहेर पडत असल्यामुळे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याचा धोका देखील निर्माण झाला आहे.
वृद्धेच्या केस पेपरवर 'बेपत्ता' असल्याचा शेरा -
यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे, कोरोना पॉझिटिव्ह असलेली वृद्धा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर पडून असल्याची माहिती घेऊन काही जण रुग्णालय प्रशासनाकडे घेऊन गेले, तेव्हा संबंधित वृद्धेच्या केस पेपरवर ती बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती. वृद्धा कोरोना वॉर्डातून बाहेर पडली तेव्हा तिच्यावर तेथील डॉक्टर्स, नर्स यांचे लक्ष नव्हते का? तिला बाहेर कसे जाऊ दिले? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. या गंभीर प्रकारची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.