जळगाव -दिवाळीनंतर जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दररोज दोन आकडी संख्येने नवीन रुग्ण समोर येत आहेत. कोरोनाचा जिल्ह्यातील रिकव्हरी रेट आता 96 टक्क्यांच्या पुढे गेला असला तरी मृत्यूदर मात्र आटोक्यात येत नसून, तो पूर्वीप्रमाणे 2.38 टक्क्यांवर कायम आहे. एकूणच जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे निरीक्षण आरोग्य यंत्रणेने नोंदवले आहे. गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात 292 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून, 12 रुग्णांचा बळीही गेला आहे. दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क असली तरी नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
जळगाव जिल्ह्यात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर एप्रिल महिन्यात संसर्ग आटोक्यात होता. परंतु, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ते ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला. कोरोनाने अक्षरशः थैमान घातले होते. पुढे सप्टेंबर महिन्यात संसर्गाचा वेग काहीसा आटोक्यात आला. ऑक्टोबरच्या प्रारंभी संसर्गाचा वेग कमी होता. परंतु, नवरात्रौत्सव, दसरा आणि त्यानंतर आलेली दिवाळी या सणांच्या काळात राज्य शासनाने टाळेबंदीत काहीअंशी शिथिलता प्रदान केल्याने नागरिकांची 'मूव्हमेंट' वाढली. आता त्यामुळेच जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे.
नागरिकांचा हलगर्जीपणा कारणीभूत?
जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला होता. परंतु, सणासुदीच्या काळात नागरिकांनी हलगर्जीपणा केल्याने संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. दसरा आणि दिवाळीच्या अनुषंगाने बाजारपेठेत तोबा गर्दी उसळली होती. आजही बाजारपेठेतील गर्दी नियंत्रित नाही. त्यामुळे कोरोनाचे नवीन रुग्ण समोर येत असल्याचा अंदाज आरोग्य यंत्रणेने वर्तवला आहे. नागरिकांच्या हलगर्जीपणामुळेच ही परिस्थिती उद्भवली आहे, असे आरोग्य यंत्रणेच्या तज्ञांचे मत आहे.
अशी आहे जिल्ह्यातील परिस्थिती-
सध्या जळगाव जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 53 हजार 989 इतकी झाली आहे. यातील 52 हजार 330 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. चिंतेची बाब म्हणजे, यात 1 हजार 286 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा रिकव्हरी रेट 96.93 टक्के इतका समाधानकारक आहे. परंतु, मृत्यूदर 2.30 टक्के असून, तो कमी न होता कायम आहे. कायम असलेला मृत्यूदर ही बाब आरोग्य यंत्रणेसाठी आव्हान ठरत आहे.
आठवडाभरात वाढले 292 रुग्ण-