जळगाव -शहरातील काेविड रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह असल्याने उपचार घेत असलेली एक ८२ वर्षीय वृद्ध महिला ५ जूनपासून बेपत्ता झाली होती. या बेपत्ता वृद्धेचा मृतदेह बुधवारी सकाळी कोविड रुग्णालयातील ७ क्रमांकाच्या वॉर्डातील शौचालयात आढळून आला. ५ दिवस हा मृतदेह शौचालयात पडून होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
मूळ भुसावळ येथे राहणारी ही महिला १ जूनला श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे तेथील रेल्वेच्या रुग्णालयातून जळगावात दाखल झाली होती. यानंतर २ जूनला ही महिला बेपत्ता झाली होती. ३ जूनला पुन्हा ती कोविड रुग्णालयातच आढळून आली. यानंतर ५ जूनपासून ती पुन्हा बेपत्ता झाली होती. याप्रकरणी काेविड रुग्णालयातील डॉक्टरांनी वृद्धेच्या नातेवाईकांना माहिती दिली. त्यानुसार नातेवाईकांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली होती. पोलीस वृद्धेचा शोध घेत होते. या घटनेमुळे कोविड रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला होता. असे असताना बुधवारी सकाळी ७ क्रमांकाच्या वॉर्डातील शौचालयातून दुर्गंधी येऊ लागली. शौचालयाची कडी आतून बंद होती. सफाई कर्मचाऱ्यांना बोलावल्यानंतर हा दरवाजा तोडण्यात आला. यावेळी आतील दृश्य मन हेलावणारे होते. शौचालयात गेल्या ५ दिवसांपासून ती भुसावळची वृद्धा मरून पडलेली असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले. यानंतर जिल्हापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृत वृद्धेची ओळख पटवली. ही वृद्धा ५ दिवसांपासून शौचालयात पडून होती. डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी, वॉर्डातील इतर रुग्ण यांच्या लक्षात ही बाब कशी आली नाही? हा प्रश्न आता समोर आला आहे. दरम्यान, बुधवारी या वृद्धेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह -