जळगाव - येथील कोविड रुग्णालयात उपचार घेणारे कोरोनाबाधित रूग्ण व महानगरपालिकेच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल असलेल्या संभाव्य कोरोना रुग्णांना सरकारी यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे अक्षरशः मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या सुश्रुषेकडे सरकारी डॉक्टर्स आणि आरोग्य सेवेतील कर्मचारी लक्ष देत नसल्याच्या तक्रारी आहेत. क्वारंटाईन सेंटर्सची परिस्थिती देखील वेगळी नाही. याठिकाणी दाखल असलेल्या संशयित रुग्णांच्या वैद्यकीय चाचणीचे अहवाल आठ-आठ दिवस मिळत नाहीत. नाश्ता, जेवण व स्वच्छता अशा सर्व प्रकारच्या गोष्टींविषयी नाराजीचा सूर असल्याची बाब 'ई- टीव्ही भारत'ने केलेल्या पाहणीत समोर आली आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अतिशय वेगाने फैलावत आहे. सद्यस्थितीत 8 हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रूग्ण आहेत. जिल्ह्यातील सर्वच 15 तालुक्यांमध्ये दररोज मोठ्या संख्येने रूग्ण आढळत असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. अशा परिस्थितीत जळगाव शहरातील जिल्हा कोविड रुग्णालय आणि महानगरपालिकेच्या क्वारंटाईन सेंटर व्यतिरिक्त तालुकास्तरावर कोविड आणि क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले आहेत. तालुकास्तरावरील अत्यावस्थ स्थितीतील रुग्णांना जिल्हा कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. त्यामुळे कोविड रुग्णालयावर सुरुवातीपासून असलेला भार कायम आहे. त्याचप्रमाणे, जळगाव महापालिका क्षेत्रातही मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळत असल्याने महापालिकेच्या कोविड आणि क्वारंटाईन सेंटरचीही हीच परिस्थिती आहे. जळगाव महानगरपालिकेने कोविड सेंटर्ससह 5 ठिकाणी क्वारंटाईन सेंटर्स उभारले आहेत. त्यांची क्षमता सुमारे 600 जणांना क्वारंटाईन करण्याची आहे. कोरोनाबाधित रूग्ण आणि संभाव्य कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढतच असल्याने आरोग्य यंत्रणेच्या कामावर मोठा परिणाम झाल्याचे पहायला मिळत आहे. कोविड रुग्णालयासह कोविड सेंटर आणि महापालिकेच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये रुग्णांना सोयीसुविधा मिळण्यासही अडचणी येत आहेत.
कोविड रुग्णालय ठरतेय मृत्यूचे दार -
जळगावातील जिल्हा कोविड रुग्णालयातील सुश्रुषेविषयी कोरोनाबाधित रूग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांकडून तक्रारी केल्या जात आहेत. येथील डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कर्मचारी व्यवस्थित लक्ष देत नसल्याचा आरोप रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक करत आहेत. कोविड रुग्णालयाची क्षमता 357 खाटांची आहे. त्यातील 55 खाटा आयसीयू वॉर्डात आहेत. मात्र, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता या खाटा अपूर्ण पडत आहेत. अशा परिस्थितीत कोविड रुग्णालय प्रशासनाला सतत रुग्णांना कोरोनासाठी अधिग्रहित केलेल्या इतर खासगी रुग्णालयांमध्ये हलवावे लागते. यात रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची फरपट होते. या रुग्णालयात अवघे 55 खाटांचे आयसीयू वॉर्ड असल्याने प्रकृती चिंताजनक असलेल्या रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन व व्हेंटिलेटर मिळत नाहीत. अनेक रुग्णांचा त्यामुळे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कोविड रुग्णालयातील अनेक वॉर्डांमध्ये स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे. याठिकाणी नियमितपणे स्वच्छता होत नाही. शौचालये आणि बाथरूमचीही अवस्था वाईट आहे.
रुग्णांच्या प्रकृतीविषयी माहितीच मिळत नाही -