जळगाव- जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा वेग काही प्रमाणात कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. नव्याने समोर येणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या दुपटीने जास्त असल्याचे दिलासादायक चित्र आहे. आरोग्य यंत्रणेच्या परिश्रमाची ही फलश्रुती आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेतली तर जिल्ह्यातील कोरोनाचा रिकव्हरी रेट हा 86.76 इतका आहे. दुसरीकडे, कोरोनाचा मृत्यूदरही 2.44 टक्के इतका खाली आला आहे. जिल्ह्यातील मृत्यूदराचा हाच आकडा एप्रिल ते जून महिन्यापर्यंत तब्बल 12 ते 14 टक्के इतका होता. परंतु, कालांतराने आरोग्य यंत्रणेत झपाट्याने झालेले फेरबदल, उपलब्ध सोयीसुविधांमुळे आता परिस्थिती बदलत आहे.
जळगाव जिल्ह्यात मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. हा रुग्ण जळगाव शहरातील होता. त्यानंतर जिल्हाभरात टप्प्याटप्प्याने कोरोनाबाधित रुग्ण समोर येऊ लागले. मे महिन्यात तर कोरोनाने जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये हातपाय पसरले. जुलै ते ऑगस्ट महिन्यात जळगाव जिल्ह्यातील परिस्थिती हाताबाहेर गेली. जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या संख्येने नवीन कोरोनाबाधित रुग्ण समोर येऊ लागले. या काळात चिंतेची बाब म्हणजे, कोरोनाचा मृत्युदर देखील वाढताच होता. हजारोंच्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण असताना आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण पडत होता. मात्र, अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणेत जलदगतीने फेरबदल करण्यात आले. आवश्यक ती यंत्रसामग्री तसेच सोयीसुविधा उपलब्ध झाल्याने कोरोनाच्या लढ्यात आरोग्य यंत्रणेला यश येऊ लागले. सद्यस्थितीत कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात ओसरला असून, दररोज नव्याने समोर येणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे.
जिल्ह्यातील कोरोनाचा रिकव्हरी रेट 85 टक्क्यांहून जास्त आहे. मृत्यूदरही घटला असून, तो आता 2.44 टक्क्यांवर आला आहे. सध्या 5 हजार 272 ऍक्टिव्ह रुग्ण-जळगाव जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 48 हजार 806 इतकी आहे. त्यातील 42343 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्हा कोविड रुग्णालयासह इतर कोविड सेंटर, खासगी रुग्णालये मिळून 5 हजार 272 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 4 हजार 146 रुग्ण कोणतीही लक्षणे नसलेले तर 1 हजार 126 रुग्ण हे लक्षणे असलेले आहेत. त्यातही 202 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 191 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.