जळगाव - प्रसिद्ध चित्रकार आनंद पाटील यांनी टाळेबंदीच्या काळात अनेक मनमोहक चित्रे रेखाटली आहेत. 'समाजाचे आपण काही देणं लागतो', या उदात्त भावनेतून त्यांनी काही निवडक चित्रे विकून, त्यातील 75 टक्के रक्कम कोरोना लढ्यात मदत म्हणून राज्य शासनाला देण्याचा निर्णय घेतला आहे. टाळेबंदीसारख्या कठिण काळात आपल्या कलेच्या माध्यमातून समाजभान जपणाऱ्या आनंद पाटील यांच्या निर्णयाचे स्वागत होत आहे. त्यांच्या निर्णयाला पाठबळ म्हणून अनेक जण चित्रे विकत घेण्यासाठी स्वतःहून पुढे येत आहेत.
आनंद पाटील यांना वृत्तपत्र क्षेत्रात आर्टिस्ट म्हणून कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. सध्या ते जळगावातील जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड या कंपनीत आर्टिस्ट म्हणून कार्यरत आहेत. लहानपणापासून कलेची, विशेषतः चित्रकलेची आवड असल्याने त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून 'बीएफए'ची पदवी मिळवली. त्यानंतर जळगावातील ओजस्विनी कला महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. आतापर्यंत त्यांनी अनेक सुबक, मनमोहक अशी चित्रे रेखाटली आहेत. विविध नामांकित संस्था आणि संघटनांच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवत पारितोषिके देखील मिळवली आहेत. त्यांची अनेक चित्रे देशविदेशातील कलाप्रेमींनी खरेदीही केली आहेत.
आता या चित्रांचे काय करावे? म्हणून ते विचारात होते. दरम्यान, याच काळात ते काम करत असलेल्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड कंपनीने समाजभान म्हणून, टाळेबंदीमुळे अडचणीत आलेल्या लोकांना मदतीचा हात दिला होता. कंपनी अनेक गोरगरिबांना दोन वेळचे सात्त्विक जेवण पुरवत होती. आपणही समाजासाठी, गोरगरीब लोकांसाठी असंच काहीतरी करावं, असा विचार आनंद पाटील यांच्या मनात आला. पण आर्थिकदृष्टीने काही करता येणे शक्य नसल्याने आपण कलेच्या माध्यमातून निश्चितच काही तरी करू शकतो, ही जिद्द त्यांच्या मनात होती. याच जिद्दीने त्यांनी एक पाऊल पुढे टाकले. टाळेबंदीच्या काळात काढलेली चित्रे विकून त्यातील 75 टक्के रक्कम कोरोना लढ्यासाठी मदत म्हणून राज्य शासनाला द्यावी, हा विचार त्यांच्या मनात आला. कुटुंबीयांसोबतच मित्रपरिवारानेही त्यांच्या निर्णयाला दाद दिली. त्यामुळे त्यांचा हुरूप वाढला.
सोशल मीडियाची घेतली मदत -
आनंद पाटील यांनी आपल्या निर्णयाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत जावी म्हणून सोशल मीडियाची मदत घेतली. 'एक हात मदतीचा' या आपल्या उपक्रमाची माहिती त्यांनी फेसबुक, व्हॉट्सएपवर शेअर करत मदतीचे आवाहन केले. सद्यस्थितीत त्यांची 2 चित्रे चांगल्या किमतीला विकली गेली आहेत. अनेक संस्था, संघटना आणि कलाप्रेमी व्यक्तींकडून चित्रांच्या खरेदीबाबत विचारणा झाली आहे. सर्व चित्रे विकली जातील, मी निश्चितच राज्य शासनाला अधिकाधिक निधी देऊ शकतो, असा आत्मविश्वास आनंद पाटील यांनी व्यक्त केला.
चित्रांमधून दिला सामाजिक संदेश -
आनंद पाटील यांनी रेखाटलेली सर्व चित्रे ही जलरंगातील आहेत. पोर्ट्रेट आणि लँडस्केप प्रकारातील चित्रांमधून त्यांनी अनेक सामाजिक संदेशही देण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत आहे. या कठिण काळात सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाशी दोन हात करण्याची गरज आहे. हा संदेश देण्यासाठी त्यांनी कोंबड्यांची झुंज, बैल, कुत्रे तसेच वाघांची लढाई, अशी चित्रे रेखाटली आहेत. याशिवाय निसर्गावर प्रेम करा हा संदेश देण्यासाठी, ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी देखील अनेक चित्रे काढली आहेत. ही चित्रे पाहताक्षणी नजरेत भरतात.