जळगाव- जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आतापर्यंत 3 हजार 651 प्रतिबंधित क्षेत्रं तयार करण्यात आले आहेत. या क्षेत्रांतील नागरिकांचे सर्व्हेक्षण करुन संशयितांची तपासणी करण्यात येत आहे. तपासणीत लक्षणे आढळलेल्या व्यक्तींची चाचणी करुन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्यावर उपाय म्हणून प्रशासनातर्फे संशयितांच्या चाचण्या वाढविण्यात आल्या आहे. एका दिवसात (7 सप्टेंबर रोजी) 4 हजार 85 संशयित व्यक्तींच्या तपासण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत जिल्ह्यात 1 लाख 49 हजार 284 इतक्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. चाचण्यांची संख्या वाढल्याने बाधित रुग्ण वाढत आहेत. परंतु जिल्ह्यात सध्या उपचार घेत असलेल्या 9 हजार 398 बाधित रुग्णांपैकी 8 हजार 154 रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. त्यामुळे नागरीकांनी घाबरुन जाऊ नये तर, जागरुक राहून आपल्या कुटुंबात कुणालाही कोरोना सदृश्य लक्षणे आढळून येत असतील तर, त्यांनी स्वत:हून पुढे येऊन तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी नागरीकांना केले आहे.