जळगाव- जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूदर हा राज्यात सर्वाधिक असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या विषयासंदर्भात थेट राज्य शासनाकडून जिल्हा प्रशासनाला विचारणा करण्यात आली होती. जळगावातील मृत्यूदर का जास्त आहे? याबाबत चौकशी करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यानुसार सविस्तर अहवाल प्रशासनाने राज्याच्या आरोग्य यंत्रणेला सादर केला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
कोरोनासंदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय, लॉकडाऊनमधील बदलांची माहिती देण्यासाठी जिल्हा नियोजन भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 52 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यातील 13 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हा मृत्यूदर एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 30 ते 32 टक्के इतका आहे. कोरोनाचा एवढा मृत्यूदर कोरोना हॉटस्पॉट असलेल्या मुंबई, पुण्यासारख्या महानगरांमध्येही नाही. त्यामुळे जिल्ह्यासह राज्याच्या आरोग्य यंत्रणेची झोप उडाली होती. राज्य शासनाने या बाबीची गंभीर दखल घेऊन जळगाव जिल्हा प्रशासनाला याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार जिल्हा प्रशासनाने याकामी तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक समिती नेमली होती. या समितीने सखोल चौकशी केली. त्यात असे निदर्शनास आले की, कोरोनामुळे ज्या व्यक्तींचे मृत्यू झाले आहेत, त्यांचा वयोगट हा 65 ते 92 वर्षादरम्यान आहे. शिवाय मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब, हायपर टेंशन, कर्करोग अशा दुर्धर आजारांनी ते आधीच ग्रस्त होते. दुर्धर आजार असताना कोरोनाची लागण झाल्याने त्यांचा लवकर मृत्यू झाल्याचा निष्कर्ष समितीने नोंदवला.
3 कोरोनाग्रस्तांचा रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच मृत्यू -
कोरोनामुळे मृत्यू झालेले 3 रुग्ण हे जिल्हा रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच मृत्यू पावले होते. नंतर त्यांच्या स्वॅबचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. इतर मृत्यू झालेले रुग्ण देखील वयोवृद्ध होते. अपवाद वगळता जिल्ह्यातील इतरांचे मृत्यू तारुण्यात कोरोनामुळे झाले आहेत, असेही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी स्पष्ट केले.
- जळगाव जिल्ह्यात सद्यस्थितीत 52 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
- जळगाव - 9
- अमळनेर - 23
- पाचोरा - 8
- भुसावळ - 9
- चोपडा - 2
- मलकापूर - 1
- मृतांची संख्या - 13
- कोरोनातून बरे झालेले रुग्ण - 1
जळगाव जिल्हा रेडझोनमध्ये असून जिल्ह्यात 15 कंटेन्मेंट झोन आहेत. त्यात जळगावात 2, भुसावळात 5, अमळनेरात 4, पाचोऱ्यात 3 तर एक चोपडा तालुक्यातील अडावदला 1 आहे.