जळगाव - सर्वत्र कोरोना विषाणूचा धुमाकूळ सुरू आहे. केंद्र आणि राज्य सरकार कोरोनाच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहेत. कोरोनाची भीती शहरी भागापासून आता ग्रामीण भागापर्यंत येऊन पोहोचली आहे. कोरोनामुळे सर्वच घटक प्रभावित झाल्याचे पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागात सध्या सुरू असलेल्या पापडांच्या हंगामालाही काही अंशी फटका बसला आहे. अनेक गावांमध्ये महिला सुरक्षेचे उपाय करत पापड करण्याला प्राधान्य देत आहेत.
कोरोनाची भीती ग्रामीण भागातही... पापडांच्या हंगामालाही फटका
कोरोनामुळे सर्वच घटक प्रभावित झाल्याचे पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागात सध्या सुरू असलेल्या पापडांच्या हंगामालाही काही अंशी फटका बसला आहे.
दरवर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून उन्हाचा तडाखा वाढू लागतो. मे महिन्याच्या अखेरपर्यंत कडक उन्ह पडते. त्यामुळे मुख्यत्त्वे करून खान्देशात याच काळात ग्रामीण भागातील महिलावर्ग वर्षभरासाठी लागणारे पापड तयार करण्याचे काम करतात. सध्या ग्रामीण भागात उडीद, नागली, गहू-तांदळाचे पापडांचा हंगाम सुरू आहे. मात्र, कोरोनामुळे या हंगामावर देखील परिणाम झाला आहे. अनेक महिलांनी भीतीमुळे पापड न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही महिला सुरक्षेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना करत पापड करण्यावर भर देत आहेत. वर्षभराच्या कालावधीसाठी लागणारे पापड याच काळात चांगले तयार करता येतात. शिवाय ते वर्षभर टिकतात. म्हणून महिलावर्ग मार्च ते मे महिन्यादरम्यान पापड करण्यावर भर देतात.
ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये कोरोनामुळे महिलावर्ग प्रतिबंधात्मक उपाय करत पापड करत आहेत. पापड लाटण्यासाठी येणाऱ्या महिला आधी आपले हात साबण किंवा हँडवॉशने धुत आहेत. तोंडाला रुमाल किंवा स्कार्फ बांधत आहेत. राज्य सरकारकडून प्रसारमाध्यमांच्या मदतीने कोरोना संदर्भात केल्या जाणाऱ्या जनजागृतीमुळे ग्रामीण भागातही सतर्कता बाळगली आत आहे. हे सकारात्मक चित्र असल्याच्या प्रतिक्रिया देखील व्यक्त होत आहेत.