जळगाव : कोरोनामुळे जळगाव जिल्हा दूध संघाला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. गेल्या २२ मार्चपासून हॉटेल, खाद्यपदार्थ विक्रीचे दुकान बंद असल्याने दुधाच्या मागणीत घट झाला आहे. यामुळे, जिल्हा दूध संघाकडे १ हजार टन दूध पावडर व १ हजार टन बटरचा साठा शिल्लक आहे. यामध्ये जवळपास ८० ते ९० कोटी रुपये अडकले आहेत. संकलित दुधातून दररोज सरासरी ५० हजार लिटर दूध शिल्लक राहत आहे. असे असले तरी दूध उत्पादकांना मात्र त्यांची रक्कम नियमित अदा केली जात आहे.
मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. यामुळे हॉटेल, आईस्क्रीम पार्लर, छोटे-छोटे चहा विक्रीची दुकाने बंद झाली. परिणामी दुधाची मागणी घटत गेली. यामुळे जिल्हा दूध संघ अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे. जिल्हा दूध संघातून जिल्ह्यासह औरंगाबाद जिल्हा तसेच मुंबईपर्यंत दुधाचा पुरवठा केला जातो. मात्र सर्वच ठिकाणी हॉटेल, आईस्क्रीम पार्लर, चहा विक्रीची दुकाने बंद असल्याने सर्वच ठिकाणातून दुधाची मागणी घटली आहे.
संघात दररोज दोन लाख लिटर दुधाचे संकलन होत असताना मार्च-एप्रिलमध्ये केवळ एक लाख पाच हजार ते एक लाख १० हजार लिटर दुधाची विक्री होऊ लागली. अनलॉकनंतर हळूहळू मागणी वाढत जाऊन आता ती दीड लाख लिटर दुधापर्यंत पोहचली आहे. मात्र, तरीदेखील अजूनही दररोज जवळपास ५० हजार लिटर दूध शिल्लक राहत आहे. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळातील दररोजचे ८० ते ९० हजार लिटर व आता दररोजचे ५० हजार लिटर दूध शिल्लक राहत असल्याने दूध संघाने त्यापासून दूध पावडर, बटर असे दुग्धजन्य पदार्थ तयार करणे सुरू केले.