जळगाव -जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांमुळे या लाटेची तीव्रता काहीअंशी कमी झाली आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आणणे ही एकीकडे आरोग्य यंत्रणेसाठी डोकेदुखी असताना दुसरीकडे, कोरोनामुळे जाणारे बळी रोखण्याचे आव्हानही आरोग्य यंत्रणेला पेलावे लागत आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नेमकी कारणे समोर यावीत, यासाठी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात डेथ ऑडिट समिती गठीत केली आहे. ही समिती दररोज रुग्णांच्या मृत्यूच्या कारणांची पडताळणी करते. त्यात रुग्णाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट होते. डेथ ऑडिटमुळे जळगावात मृत्यूदर नियंत्रणात येण्यास मदत झाली आहे.
रुग्णालयात उशिराने दाखल होणे बेतते जीवावर-
जिल्ह्यातील मृत्यूदराबाबत 'ईटीव्ही भारत'शी बोलताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण म्हणाले की, जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे ही लाट मध्यंतरी तीव्र होती. त्यामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढले होते. दुसऱ्या लाटेत को-मोर्बिड रुग्णांचे अधिक मृत्यू झाले. को-मोर्बिड रुग्ण वेळेत उपचार घेण्यात हलगर्जीपणा करत असल्याने त्यांचा मृत्यू होत आहे. कोरोनाची लक्षणे दिसूनही चाचणीला विलंब करणे, चाचणी केल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचे समोर येऊनही योग्य उपचार घेण्याकडे दुर्लक्ष करणे, प्रकृती चिंताजनक झाल्यावर रुग्णालयात दाखल होणे, अशा परिस्थितीत श्वसनसंस्थेवर परिणाम होऊन रुग्णाचा जीव वाचवण्यात अपयश येते. या सारखी कारणे डेथ ऑडिटमध्ये समोर आली आहेत. याच प्रमुख कारणांमुळे जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण वाढले होते. हे प्रमाण कमी करायचे असेल तर नागरिकांनी लक्षणे दिसून येताच उपचार घ्यायला हवा, असे डॉ. नागोराव चव्हाण म्हणाले.
असे चालते डेथ ऑडिट समितीचे काम-
जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या अध्यक्षतेखाली डेथ ऑडिट समिती गठीत केली आहे. औषध वैद्यकशास्त्र विभागाच्या सहायक प्राध्यापक डॉ. योगिता बावस्कर यांच्यासह विविध विभागांचे वैद्यकीय अधिकारी या समितीत आहेत. रुग्णालयात दररोज किती रुग्णांचा मृत्यू झाला, याची माहिती ही समिती संकलित करते. त्यानंतर प्रत्येक रुग्णांची मेडिकल हिस्ट्री तपासली जाते. त्यात रुग्णाला कोरोनाची लागण होण्यापूर्वी काही दुर्धर आजार होता का, रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्याचा किती कालावधीनंतर मृत्यू झाला, उपचारादरम्यान त्याच्यावर कोणता औषधोपचार झाला, यासारखी माहिती घेतली जाते. त्यानंतर रुग्णाच्या मृत्यूच्या कारणाची खात्री केली जाते. या पडताळणीत बहुतांश रुग्ण हे आजार अंगावर काढत असल्याने मृत्यूमुखी पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. डेथ ऑडिट समितीने संकलित केलेली माहिती व रुग्णांच्या मृत्यूबाबत काढलेला निष्कर्ष याची माहिती अधिष्ठाता कार्यालयासह जिल्हा प्रशासनाला सादर केली जाते.
पहिल्या लाटेत देशात सर्वाधिक होता जळगावचा मृत्यूदर-
जळगाव जिल्ह्यात मागील वर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढायला लागला. या काळात कोरोनाचा संसर्ग जसजसा वाढत गेला तसा कोरोनाच्या बळींचा आकडाही वाढत गेला. तेव्हा जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूदर हा देशात सर्वाधिक म्हणजेच एकूण पॉझिटिव्हिटीच्या तुलनेत 13 टक्के इतका मोठा होता. सलग तीन महिने हीच परिस्थिती कायम होती. नंतर आरोग्य यंत्रणेच्या वतीने शर्थीचे प्रयत्न करून मृत्यूदर नियंत्रणात आला. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात कोरोना संसर्गाचा वेग मंदावल्यानंतर मृत्यूदरही अडीच ते तीन टक्क्यांपर्यंत खाली आला. मध्यंतरी जिल्ह्यातील मृत्यूदर हा 2.38 टक्क्यांवर स्थिर होता. मात्र, जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट धडकल्यानंतर मृत्यूदर पुन्हा वाढला. दुसरी लाट सुरू होण्यापूर्वी कोरोनाचे गांभीर्य कमी झाले. त्यामुळे नागरिकांचा हलगर्जीपणा वाढला. परिणामी कोरोनाचा प्रसार वेगाने होऊ लागला. या लाटेची तीव्रता अधिक असल्याने कुटुंबच्या कुटुंब संसर्गग्रस्त होण्याचे प्रमाण अधिक होते. आता मात्र, परिस्थिती काहीशी नियंत्रणात येत आहे.
आता नियंत्रणात आहे मृत्यूदर-
जळगाव जिल्ह्यातील मृत्यूदर आता नियंत्रणात आला आहे. सद्यस्थितीत तो 1.79 टक्के इतका आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक 556 मृत्यू हे जळगाव शहरात झाले आहेत. त्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर भुसावळ तालुका आहे. याठिकाणी 323 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जळगाव ग्रामीण, अमळनेर, रावेर, जामनेर, चाळीसगाव, चोपडा, यावल, धरणगाव, पाचोरा, एरंडोल या तालुक्यांमध्येही तीन आकडी संख्येने मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजेच 44 रुग्णांचे मृत्यू हे पारोळा तालुक्यात झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण 2 हजार 469 मृत्यूंपैकी 1 हजार 232 रुग्ण हे दुर्धर आजार असलेले म्हणजेच को-मोर्बिड होते, तर 1 हजार 274 रुग्ण हे 50 व त्यापेक्षा जास्त वयोगटातील होते.