महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव शहरात कोरोनाचा उद्रेक; नागरिकांच्या बेफिकिरीने बनले कोरोनाचे हॉटस्पॉट - कोरोना लसीकरण

जळगाव जिल्ह्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला होता. मात्र, आता पुन्हा संसर्ग वाढू लागला आहे. जिल्ह्यातील जळगाव शहर, अमळनेर, चाळीसगाव, मुक्ताईनगर, चोपडा या तालुक्यांमध्ये कोरोना हातपाय पसरत आहे. विशेष करून, जळगावात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. एकट्या जळगाव शहरात शेकडो रुग्णांची भर पडत आहे.

JALAGAON
जळगाव शहरात कोरोनाचा उद्रेक

By

Published : Feb 25, 2021, 6:33 AM IST

Updated : Feb 25, 2021, 7:16 AM IST

जळगाव -जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. दररोज शेकडोंच्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण समोर येत आहेत. जळगाव शहर हे सद्यस्थितीत जिल्ह्यातील कोरोनाचे प्रमुख हॉटस्पॉट आहे. दररोज समोर येणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत निम्मे रुग्ण हे एकट्या जळगाव शहरातील असतात. बाजारपेठेतील अनियंत्रित गर्दी, लग्न समारंभ, राजकीय सभा व मेळावे, इतर कार्यक्रम अशा कारणांमुळे जळगावात कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. नागरिकांनी वेळीच गांभीर्य लक्षात घेतले नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती आहे.

जळगाव शहरात कोरोनाचा उद्रेक

जळगाव जिल्ह्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला होता. मात्र, आता पुन्हा संसर्ग वाढू लागला आहे. जिल्ह्यातील जळगाव शहर, अमळनेर, चाळीसगाव, मुक्ताईनगर, चोपडा या तालुक्यांमध्ये कोरोना हातपाय पसरत आहे. विशेष करून, जळगावात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. एकट्या जळगाव शहरात शेकडो रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

गेल्या 8 दिवसांत 841 नवे बाधित-

जळगाव शहरातील कोरोना संसर्गाचा विचार केला तर याठिकाणी गेल्या 8 दिवसातच तब्बल 841 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. हा आकडा सर्वांची चिंता वाढवणारा आहे. जळगाव शहराच्या चौफेर कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. विशेष करून शहराचा मध्यवर्ती भाग असलेला गणेश कॉलनी परिसर, रिंगरोड, पिंप्राळा उपनगर, अयोध्यानगर, सुप्रिम कॉलनी, जुने जळगाव, शिवाजीनगर, मेहरूण परिसर, वाघनगर, हरीविठ्ठलनगर, समतानगर, मोहाडी रस्ता परिसर, महाबळ, खोटेनगर अशा सर्वच भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. काही कॉलन्यांमध्ये तर संसर्ग वेगाने वाढत आहे.

'ही' आहेत संसर्ग वाढण्याची कारणे-

जळगाव शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. नागरिकांचा हलगर्जीपणा हे त्या मागचे प्रमुख कारण आहे. बाजारपेठेतील अनियंत्रित गर्दी, लग्न समारंभ, राजकीय सभा व मेळावे, इतर कार्यक्रम, घराबाहेर पडताना अजूनही काही महाभाग तोंडाला मास्क लावत नाहीत. अशा वागण्यामुळे ते स्वतःचा जीव तर धोक्यात घालतातच, शिवाय दुसऱ्याला देखील संसर्ग होण्यास अनुकूल वातावरण निर्माण करतात. सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशनचा विसर यामुळेही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. अनेक नागरिक भीतीपोटी लक्षणे जाणवत असली तरी चाचणी करण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे ते कोरोनाचे कॅरीयर म्हणून वावरत असतात. यामुळे देखील कोरोना वाढत आहे.

आरोग्य यंत्रणेचाही हलगर्जीपणा-

कोरोनाचा संसर्ग वाढण्यास आरोग्य यंत्रणेचा हलगर्जीपणाही तितकाच कारणीभूत असल्याचे पाहायला मिळत आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व्यवस्थितपणे होत नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या अगोदर एका बाधित रुग्णामागे किमान दहा हायरिस्क कॉन्टॅक्ट व्यक्तीच्या तपासण्या केल्या जात होत्या. परंतु, गेल्या काही दिवसांपासून याकडे गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही. सध्या बाधित रुग्णाच्या कुटुंबीयांना सोडून त्याच्या संपर्कातील दुसऱ्या हायरिस्क व्यक्तींची चाचणी केली जात नाही. त्यामुळे कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, पहिल्या लाटेच्या वेळी कोरोना संशयित व्यक्तीची चाचणी झाल्यानंतर त्याला क्वारंटाईन केले जायचे. अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच त्याला घरी सोडले जात होते. आता संशयित व्यक्ती चाचणी केल्यावर थेट घरी जातो. अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर त्याला शोधले जाते. यामुळेही कोरोना वाढत आहे. हे कमी की काय, कोरोनासदृश्य लक्षणे असलेल्या आणि अहवाल पॉझिटिव्ह आलेले अनेक जण होम क्वारंटाईनचा पर्याय निवडतात. अशा वेळी संबंधित व्यक्ती घरी विलगीकरणात न राहता कुटुंबीयांमध्ये सहज मिसळतात. त्यामुळे इतरांना संसर्ग होतो. ही सारी कारणे कोरोनाच्या पथ्यावर पडत आहेत.

जळगाव शहरातील आठवडाभरात आढळलेले रुग्ण असे-

24 फेब्रुवारी- 164 रुग्ण
23 फेब्रुवारी- 164 रुग्ण
22 फेब्रुवारी- 158 रुग्ण
21 फेब्रुवारी- 79 रुग्ण
20 फेब्रुवारी- 78 रुग्ण
19 फेब्रुवारी- 79 रुग्ण
18 फेब्रुवारी- 84 रुग्ण
17 फेब्रुवारी- 43 रुग्ण

बुधवारी आढळले 363 नवे बाधित तर 2 रुग्णांचा मृत्यू-

जिल्हा प्रशासनाला बुधवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 363 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर दोन रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. जळगाव शहरात बुधवारी देखील सर्वाधिक 164 रुग्ण आढळले. त्याचप्रमाणे चाळीसगाव तालुक्यात 53, चोपडा तालुक्यात 30, अमळनेरात 24 तर मुक्ताईनगर तालुक्यात 18 कोरोना बाधित आढळले. जिल्ह्यात आता ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 790 इतकी झाली आहे. त्यात 498 रुग्णांना लक्षणे आहेत, तर एक हजार 292 रुग्णांना लक्षणे नाहीत.

Last Updated : Feb 25, 2021, 7:16 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details