जळगाव- जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असून शुक्रवारी देखील दिवसभर पाऊस सुरूच होता. जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमानाने वार्षिक सरासरीची साठी पार केली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या 63.01 टक्के इतका पाऊस पडला आहे. पावसामुळे जिल्ह्यातील पीक परिस्थिती उत्तम आहे. परंतु, आठवडाभरापासून सूर्यदर्शन नसल्याने पिकांची प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावली आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर पिके कुजण्याची भीती आहे.
जळगाव जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 663.3 मिलीमीटर इतके आहे. मागील वर्षी 9 ऑगस्ट 2018 पर्यंत वार्षिक सरासरीच्या फक्त 39.1 टक्के म्हणजेच 257.1 मिलीमीटर इतका पाऊस पडला होता. यावर्षी मात्र, 9 ऑगस्टपर्यंत 418.5 मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीचा विचार केला असता शुक्रवारपर्यंत सर्वाधिक 73.6 टक्के इतका पाऊस जामनेर तालुक्यात पडला आहे. तर सर्वात कमी म्हणजेच 48.4 टक्के पाऊस हा चाळीसगाव तालुक्यात पडला आहे. जिल्ह्यात 9 ऑगस्ट रोजी एकाच दिवसात 48.1 मिलीमीटर सरासरी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत तालुकानिहाय पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये कंसात (वार्षिक सरासरीशी टक्केवारी)
जळगाव–426.9 मि.मी. (62.1 टक्के), जामनेर- 531.1 मि.मी. (73.6), एरंडोल- 412.5 मि.मी. (66.2), धरणगाव 395.4 मि.मी. (63.5), भुसावळ–467.2 मि.मी. (69.8), यावल 496.6 मि.मी. (71.2), रावेर– 440.2 मि.मी. (65.9), मुक्ताईनगर 476.1 मि.मी. (76.0), बोदवड– 425.9 मि.मी. (63.6), पाचोरा– 430.1 मि.मी. (57.9), चाळीसगाव 319.8 मि.मी. (48.4), भडगाव 346.6 मि.मी. (51.7), अमळनेर 348.2 मि.मी. (59.8), पारोळा 355.6 मि.मी. (57.7), चोपडा 405.2 मि.मी. (58.6) याप्रमाणे जिल्ह्यात आजपर्यंत एकूण वार्षिक सरासरीच्या 63.01 टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
हतनूर धरणाचे ४१ गेट पूर्ण उघडले-
भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने शुक्रवारी दुपारी हतनूर धरणाचे ४१ गेट पूर्णपणे उघडण्यात आले होते. धरणातून २ लाख ४२ हजार ५०७ क्यूसेक वेगाने तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. त्यामुळे तापी काठावरील गावातील नागरिकांना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.