जळगाव -ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने रंगात आली आहे. कोरोना काळात ग्रामीण पातळीवर होत असलेली ही पहिलीच मोठी निवडणूक असल्याने राजकीय पक्षांमध्येही उत्साह वाढला आहे. राज्याच्या सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीला एकत्र सामोरे जाण्याचा निर्णय जाहीर केला असला, तरी जळगाव जिल्ह्यात मात्र, काँग्रेसने या निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे काँग्रेस आता परंपरागत शत्रू असलेल्या भाजपसह मित्रपक्षांविरुद्ध मोट बांधणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जळगाव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसचा स्वबळाचा नारा - जळगाव ग्रामपंचायत निवडणूक
काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्याच्या सत्तेत एकत्र आहेत. परंतु, असे असले तरी निधी वाटपासह महत्त्वपूर्ण निर्णय प्रक्रियेत सापत्न वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी काँग्रेसच्या नेतेमंडळीकडून केल्या जात आहेत. याचेच पडसाद ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यात उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे.
![जळगाव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसचा स्वबळाचा नारा जळगाव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसचा स्वबळाचा नारा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10110993-479-10110993-1609742661524.jpg)
काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्याच्या सत्तेत एकत्र आहेत. परंतु, असे असले तरी निधी वाटपासह महत्त्वपूर्ण निर्णय प्रक्रियेत सापत्न वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी काँग्रेसच्या नेतेमंडळीकडून केल्या जात आहेत. याचेच पडसाद ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यात उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. याठिकाणी काँग्रेसने वेगळी चूल मांडत ग्रामपंचायत निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. जळगाव जिल्हा हा पूर्वाश्रमीचा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मध्यंतरीच्या काळात काँग्रेसचा प्रभाव ओसरून भाजपने जिल्ह्यात पाळेमुळे रोवली. मात्र, आता पुन्हा भाजप विरोधात वातावरण निर्माण झाल्याने काँग्रेस ग्रामीण पातळीवर निश्चितच मुसंडी मारेल, असा विश्वास काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना आहे.
मित्रपक्षांशी संघर्ष होणार?
दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्याने मित्रपक्ष शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राज्याच्या सत्तेत एकत्र असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वरिष्ठ पातळीवर जुळवून घेतले असून, कार्यकर्त्यांनाही मतभेद विसरण्याच्या सूचना केल्या आहेत. परंतु, काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे जळगावात महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे.