जळगाव -विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून मला सहाव्या जागेसाठी ऑफर आली होती. भाजपच्या 6 ते 7 आमदार मला मतदान करणार होते. त्यांनी स्वतः माझ्याकडे असे मान्य केले होते, असा गौप्यस्फोट भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने तिकिट कापल्यानंतर एकनाथ खडसे दररोज नवनवे गौप्यस्फोट करत आहेत. आज (सोमवार) दुपारी त्यांनी मुक्ताईनगर येथे माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी पुन्हा एक मोठा गौप्यस्फोट करत राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
हेही वाचा...विधानपरिषद निवडणूक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून उमेदवारी अर्ज दाखल
विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपच्या निवड समितीने ज्या इच्छुकांच्या नावांच्या शिफारशी केल्या होत्या, त्यात आता ज्या चार जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यांची नावे नव्हती. त्यात माझ्यासह इतर तिघांची नावे होती. मात्र, निवड समितीने दिलेली नावे अंतिमतः वगळून नव्या लोकांना पक्षाने उमेदवारी दिली. त्यावर पक्षाने शिक्कामोर्तब केले, असेही खडसे यांनी सांगितले आहे.