जळगाव - 'राजीव गांधी हे खूप मोठ्या आणि व्यापक मनाचे व्यक्ती होते. आज राजीवजी हयात असते तर त्यांनीही खेलरत्न पुरस्काराच्या नामांतराच्या निर्णयाचे स्वागतच केले असते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे किती संकुचीत मनाचे आहेत, हेच या निर्णयावरून दिसत आहे. आम्ही सर्वांनी तर या निर्णयाचे स्वागतच केले आहे. या साऱ्या गोष्टी वेगळ्या प्रकारे हाताळता आल्या असत्या', अशा शब्दात काँग्रेसच्या नेत्या तथा महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
यशोमती ठाकूर आज (7 ऑगस्ट) काँग्रेसच्या 'व्यर्थ न हो बलिदान' कार्यक्रमासाठी जळगावात आल्या होत्या. या कार्यक्रमानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी खेलरत्न पुरस्काराचे नामांतर, देशातील लसीकरणाची स्थिती, राज्यातील महाविकास आघाडी सरकारची वाटचाल अशा मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली.
मोदी सरकारचा पुरस्कार नामांतरणाचा निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने देशातील क्रीडा क्षेत्रात सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलले आहे. आता हा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न या नावाने ओळखला जाईल. यावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. याच विषयावर यशोमती ठाकूर यांनीही आपली भूमिका मांडली.
केंद्राकडून लसीकरणाचे राजकारण -
'लसीकरण जर मोठ्या प्रमाणावर झाले असते आणि केंद्र सरकारने त्यात राजकारण केले नसते तर आज देशात 50 टक्के लसीकरण होऊ शकले असते. पण दुर्दैवाने तसे झाले नाही. लसीकरणाचे राजकारण झाले. आज जर आपण लसीकरणाची टक्केवारी लक्षात घेतली तर एक डोस घेतलेल्यांची टक्केवारी 30 इतकी आहे. देशपातळीवर तर ही टक्केवारी अवघी 10 ते 15 टक्के आहे', असे यशोमती म्हणाल्या.