जळगाव -केंद्र सरकारने नुकत्याच मंजूर केलेल्या शेतकरी आणि कामगार सुधारणा कायद्याच्या मुद्द्यावरून देशभरात विरोधकांनी रान पेटवले आहे. या कायद्यांमुळे शेतकरी तसेच कामगार देशोधडीला लागतील. त्यामुळे हे कायदे मागे घ्यावेत, अशी विरोधकांची मागणी आहे. याच मागणीसाठी सोमवारी जळगावात काँग्रेसच्या वतीने ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून काँग्रेसने केंद्र सरकारचा निषेध केला.
शहरातील काँग्रेस भवनापासून दुपारी 3 वाजता या ट्रॅक्टर रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली टॉवर चौक, नेहरू चौक, शिवतीर्थ मैदान, जिल्हा क्रीडा संकुल, नवीन बसस्थानक, स्वातंत्र्य चौकमार्गे थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली. या रॅलीत काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, जळगाव जिल्ह्याचे निरीक्षक प्रकाश मुगदिया, जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप पाटील, प्रदेश सचिव डी. जी. पाटील, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्यासह काँग्रेसचे जिल्हभरातील पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिला देखील मोठ्या संख्येन या रॅलीत सहभागी झाल्या होत्या.
रॅलीत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी
रॅलीत सहभागी प्रत्येक ट्रॅक्टरवर केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा असलेले फलक लावण्यात आले होते. रॅलीदरम्यान आंदोलकांनी केंद्र सरकारची धोरणे, शेतकरी तसेच कामगार विरोधी कायद्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर त्या ठिकाणी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी भाषणे केली.