जळगाव - शिवसेना, भाजपमध्ये युती झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यात सेना नेत्यांची भाजपवरील नाराजी समोर आली. अशातच आता काँग्रेस-राष्ट्रवादीत देखील कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत. रावेरची जागा काँग्रेसला सोडली नाही, तर जळगाव लोकसभेत काँग्रेसचा एकही पदाधिकारी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काम करणार नाही, असा पवित्रा काँग्रेसने घेतला आहे. रावेर लोकसभेत काँग्रेसचे प्राबल्य असून राष्ट्रवादीने यावेळी ही जागा सोडावी, अशी काँग्रेसची मागणी आहे.
जळगावात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगीतुरा रंगण्याची चिन्हे; रावेर लोकसभेच्या जागेवर दावे-प्रतिदावे - अॅड. संदीप पाटील
काँग्रेसच्या जिल्हा प्रभारी हेमलता पाटील तसेच जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांनी मंगळवारी काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आघाडी निश्चित झाली असताना मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडून काँग्रेसला सन्मानाची वागवणूक दिली जात नसल्याचे म्हणत याबद्दल काँग्रेसमधून नाराजी व्यक्त होत आहे.
काँग्रेसच्या जिल्हा प्रभारी हेमलता पाटील तसेच जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांनी मंगळवारी काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आघाडी निश्चित झाली असताना मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडून काँग्रेसला सन्मानाची वागवणूक दिली जात नसल्याचे म्हणत याबद्दल काँग्रेसमधून नाराजी व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे रावेरची जागा वर्षानुवर्षे राष्ट्रवादीकडे आहे. सातत्याने तेथे राष्ट्रवादीचा पराभव होत असल्याने रावेरची जागा आता काँग्रेसला सोडावी, अशी मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. ही मागणी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवली असल्याचेही संदीप पाटील यांनी सांगितले.
जळगाव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ते मतदारसंघात मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आघाडी झालेली असताना राष्ट्रवादीचे पदाधिकारी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत नाहीत. जाणीवपूर्वक अपमानास्पद वागणूक देतात, असा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या स्थानिक गटात नाराजीचे वातावरण आहे, असेही पाटील यांनी सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेस महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, डी. जी. पाटील, प्रदीप पवार, सलीम पटेल, उदय पाटील उपस्थित होते.