जळगाव - नुकताच जळगाव शहरात उपमहापौर आपल्या दारी हा उपक्रम राबवला. प्रत्येक वॉर्डात जावून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी नगरसेवक वॉर्डात येत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. भाजपाचे देखील काही नगरसेवक वॉर्डात जात नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी व्यक्त केल्याने या नगरसेवकांना आपण याबाबत माहीती दिल्याची कबुली आज उपमहापौर सुनिल खडके यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
दौरा काढण्यापूर्वी भाजपाचे नेते माजी मंत्री गिरिश महाजन व महानगराध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांची परवानगी घेतल्याचे सांगीतले. मात्र, आमदार भोळेंची परवानगी का घेतली नाही, यावर प्रतिक्रिया न दिल्याने खडके यांच्या पत्रकार परिषदेतून भाजपातील गटबाजी उघड झाली.
उपमहापौर आपल्या दारी या उपक्रमाची सांगता १८ डिसेंबर रोजी झाली. या उपक्रमाबाबत माहिती देण्यासाठी उपमहापौर सुनील खडके यांनी आपल्या मनपातील दालनात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, मनपाचे आरोग्य सभापती चेतन सनकत, नगरसेवक अमीत काळे, डॉ.चंद्रशेखर पाटील, किशोर बावीस्कर, मनोज अहुजा, ॲड. दिलीप पोकळे, माजी नगरसेवक मनोज काळे आदी उपस्थित होते.
उपमहापौरांच्या दौऱ्याची उडवीली खिल्ली -
आमदार भोळे यांनी उपमहापौर यांच्या दौऱ्याबाबत ‘नव्याचे नऊ दिवस’असतात असे सांगत, उपमहापौरांच्या दौऱ्याची खिल्ली उडवीली होती. याबाबत उपमहापौरांना प्रश्न विचारला असता त्यांनी या प्रश्नावर कोणतेही उत्तर दिले नाही. शेतकरी असल्याने प्रत्यक्ष कामावर जावूनच समस्या ऐकून घेतो असे सांगत, वेळ मारून नेली. उपमहापौरांनी काढलेल्या प्रेसनोटवर काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा नावाचा समावेश केला. मात्र, स्थायी समिती सभापतींचा नावाचा उल्लेख नसल्याचा प्रश्नावरही उपमहापौरांनी बोलणे टाळले. तसेच हा उपक्रम उपमहापौरांचा असल्याने व स्थायी समितीसभापतीपद हे समकक्ष असल्याने त्यांचे नाव घेतल्याचे त्यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रारी-
दौऱ्यात रस्ते, गटारी व स्वच्छतेच्या समस्या आढळून आल्या. याबाबत काही तक्रारींचा निपटारा जाग्यावरच करण्यात आल्या. तर काहीठिकाणी अधिकाऱ्यांबाबत देखील तक्रारी आल्या असल्याची माहिती उपमहापौरांनी दिली. याबाबत मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याकडे मनपातील ४ अभियंता व ४ आरोग्य निरीक्षक अशा ८ जणांची लेखी तक्रार केली असून, यांच्याकामात गतिमानता आणण्याबाबत सूचना दिल्याची माहिती उपमहापौरांनी दिली.