जळगाव -कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्याने राज्यात आजपासून महाविद्यालये उघडली. जळगाव जिल्ह्यात देखील सर्वत्र महाविद्यालये उघडली. त्यामुळे तब्बल दीड वर्षांहून अधिक काळानंतर महाविद्यालयांचे कट्टे विद्यार्थ्यांच्या गर्दीने फुलून गेल्याचे पाहायला मिळाले. महाविद्यालये उघडल्याने विद्यार्थी तसेच प्राध्यापकवर्गात आनंदाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, जळगावातील सर्वच महाविद्यालयांमध्ये कोरोनाच्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन केल्याचे दिसून आले. नूतन मराठा महाविद्यालयात प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे प्रवेशद्वारावर गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
- खान्देशातील 225 महाविद्यालये उघडली-
दीर्घ कालावधीनंतर बुधवारपासून खान्देशातील 225 वरिष्ठ महाविद्यालये विद्यार्थ्यांसाठी उघडली. विद्यापीठाकडून महाविद्यालयातील वर्ग सुरू करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. महाविद्यालये, परिसंस्था व प्रशाळा सुरू करताना 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेने सुरु करताना कोरोनाचा स्थानिक पातळीवरील प्रादुर्भाव व परिस्थिती, प्रतिबंधित प्रक्षेत्रांचे नियोजन तसेच आरोग्यविषयक पायाभूत सुविधांची उपलब्धता या बाबी विचारात घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या साऱ्या बाबी लक्षात घेऊन आज महाविद्यालये उघडली आहेत.
- प्रवेशद्वारावर प्रत्येक विद्यार्थ्याचे स्क्रिनिंग-
जळगावातील महाविद्यालयांमध्ये प्रवेशद्वारावर प्रत्येक विद्यार्थ्याचे स्क्रिनिंग करण्यात येत होते. विद्यार्थ्यांचे तापमान मोजणी, हातांचे सॅनिटायझेशन केल्यानंतर आत प्रवेश दिला जात होता. वर्गात प्रवेश देण्यापूर्वी विद्यार्थ्याला लसीकरणाबाबत विचारणा केली जात होती. लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश दिला जात होता. ज्या विद्यार्थ्यांनी लस घेतलेली नाही किंवा एकच डोस घेतला आहे, त्यांना घरी परत पाठवले जात होते. अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.
- नूतन मराठा महाविद्यालयाचे चोख नियोजन-