जळगाव- प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या कामाच्या विषयावरून जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी एका ग्रामसेवकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत निलंबित करण्याची धमकी दिली. बुधवारी हा प्रकार घडला. यामुळे मन:स्ताप झाल्याने ग्रामसेवकाची प्रकृती बिघडली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, ग्रामसेवक संघटनेने या घटनेची गांभीर्याने दखल घेत गुरुवारपासून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे काम बंद करण्याचा इशारा दिला आहे.
यावल तालुक्यातील चिखली येथील ग्रामसेवक पी. व्ही. तळेले यांना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी पाडळसे येथील प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे काम का करत नाही, अशी विचारणा केली. त्यावर तळेले यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे लाभार्थी निश्चित करण्यासाठी तलाठ्यांना सहकार्य म्हणून माहिती गोळा करण्याचे काम करतो. मात्र, ती माहिती अपलोड करून महसूल खात्याचे रेकॉर्ड अद्ययावत करण्याची जबाबदारी सर्वस्वी आपली नाही, असे उत्तर दिले. त्यावर जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी तळेले यांना एकेरी भाषेत शिवीगाळ व दमदाटी करत निलंबित करण्याची धमकी दिली.