जळगाव- नाशिक येथील एका व्यक्तीने कोरोनाची लस घेतल्यानंतर आपल्या अंगाला नाणी तसेच स्टीलच्या वस्तू चिटकत असल्याचा दावा केला आहे. यानंतर ठिकठिकाणी असे प्रकार घडत असल्याचे समोर येत आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल शहरातील एका व्यक्तीने देखील हा प्रयोग करून पाहिला असता त्याच्या अंगाला नाणी व स्टीलच्या वस्तू चिटकल्या. या व्यक्तीनेही कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.
प्रयोग करुन पाहिला आणि वस्तु खरच चिटकल्या
पी.जी. पाटील असे या व्यक्तीचे नाव असून, ते एरंडोल शहरातील विद्यानगर भागातील रहिवासी आहेत. पाटील हे खडके खुर्द येथील महेंद्रसिंग पाटील माध्यमिक विद्यालयात लिपीक आहेत. शनिवारी सकाळी ते नाश्ता करण्यासाठी घरातील स्वयंपाकगृहात गेले. त्याठिकाणी स्टीलचे चमचे पडलेले होते. नाशिक येथे घडलेल्या घटनेची माहिती असल्याने त्यांनी सहज आपल्या अंगाला स्टीलच्या वस्तू चिटकतात का? म्हणून प्रयोग करून पाहिला तर त्यांच्या अंगाला स्टीलचा चमचा चिटकला. कुतूहल निर्माण झाल्याने त्यांनी एक रुपया, दोन रुपयांची नाणी अंगाला चिटकवून पाहिले. ते पण सहज चिटकले.