जळगाव - विभिन्न विचारसरणी असलेले तीन पक्ष एकत्र येऊन स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार फार काळ टिकणार नाही, अशी टीका भाजपकडून सुरू आहे. या टीकेला शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरात जोरदार प्रत्युत्तर दिले. 'आमचं सरकार मजबूत आहे. तुमच्यात हिंमत असेल तर आमचं सरकार पाडून दाखवा', अशा शब्दात त्यांनी भाजपला खुले आव्हानच दिले.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरात प्रथमच शिवसेना, राष्ट्रवादी तसेच काँग्रेसचा एकत्रित जाहीर शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. ठाकरेंसोबत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित होते. मेळाव्यात भाषण करताना उद्धव ठाकरेंनी भाजपचा खरपूस समाचार घेतला.
ते पुढे म्हणाले, राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या विकासाचा हेतू डोळ्यासमोर ठेऊन आम्ही एकत्र आलो. सरकारच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून सतत टीका-टिप्पणी केली जात आहे. विभिन्न विचारसरणी असलेले तीन पक्ष एकत्र येऊन स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार किती दिवस चालेल. आम्ही लवकरच सत्तेत येऊ, असे भाजप नेते सांगत सुटले आहेत. मात्र, आम्ही एकत्र आहोत आणि आमचे सरकार मजबूत सरकार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
जनतेने तुम्हाला लोटलं ना...
एप्रिलनंतर 'ऑपरेशन लोटस' नावाची कोणती तरी मोहीम भाजप हाती घेणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्याने काहीएक फरक पडणार नाही. महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला बाजूला लोटले ना. आता काही झाले तरी जनता तुम्हाला परत दूर लोटल्याशिवाय राहणार नाही. महाविकास आघाडीचे सरकार हे 5 वर्षे पूर्ण करेल. आमचे सरकार मजबूत आहे. तुमच्यात हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा. उद्या कशाला आज नाही तर आत्ताच पाडून दाखवा. आम्ही सत्तेसाठी हापापलेलो नाही, अशा कडक शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपचा समाचार घेतला.
आमचे सरकार सर्वसामान्यांचे सरकार-
महाविकास आघाडीचे सरकार हे सर्वसामान्य तसेच गोरगरीब जनतेचे सरकार आहे. आमचे सरकार आल्यानंतर संपूर्ण राज्यातील जनतेच्या मनात आनंद आहे. हे सरकार शेतकरी, सर्वसामान्य लोकांची आस्थेवाईकपणे चौकशी करणारे, त्यांचा कैवार असलेले सरकार आहे, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
खडसेंना चिमटा-