जळगाव - साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या कामावर त्यांनी स्तुतीसुमने उधळली आहेत. या विषयावर पत्रकारांनी विचारणा केली असता फडणवीस म्हणाले, की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात जी कामे पश्चिम महाराष्ट्रात झाली नाहीत ती कामे भाजपच्या सरकारने केली. उदयनराजे भोसलेंनी स्वतः तशी कबुली देखील दिली आहे. ते भाजपत येणार असल्याची चर्चा आहे. ते भाजपात आले तर चांगलेच आहे. त्यांचे आम्ही स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
महाजनादेश यात्रेदरम्यान शनिवारी सकाळी 10 वाजता भुसावळ येथे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. महाजनादेश यात्रेदरम्यान शनिवारी सकाळी 10 वाजता भुसावळ येथे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. महाजनादेश यात्रेची आतापर्यंतची वाटचाल, यात्रेचे पुढचे नियोजन, विरोधक अशा विविध प्रकारच्या मुद्यांवर त्यांनी संवाद साधला. आतापर्यंत 13 जिल्ह्यातील 50 मतदारसंघात यात्रा पोहचली आहे. 1 हजार 325 किलोमीटर अंतर यात्रेने पूर्ण केले आहे. जळगाव जिल्ह्यातून आता ही यात्रा विदर्भात जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
गेल्या ५ वर्षात विरोधकांना सूर सापडला नाही -
गेल्या ५ वर्षात आमच्या विरोधकांना सूरच सापडला नाही. लोकसभा निवडणुकीपर्यंत मोदींना शिव्या देणे, हा त्यांचा एकमेव अजेंडा होता. मात्र, हा अजेंडा काही चालला नाही. आता ईव्हीएम हा त्यांचा नवा अजेंडा आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काँग्रेस-राष्ट्रवादीवर निशाणा साधला.
मोदींना शिव्या देऊन उपयोग नाही -
ईव्हीएम हा विरोधकांचा नवा अजेंडा आहे. पण त्यांना हे कळत नाही, की आपण पेपर लिहायला जातो. त्यानंतर पास होतो किंवा नापास होतो, त्याला पेन जबाबदार नसतो. आपला अभ्यास, आपली मेहनत तसेच आकलन जबाबदार असते. पण आता मोदींना शिव्या देऊन उपयोग नाही, हे विरोधकांमधील काहींना कळायला लागले आहे. जयराम रमेश, अभिषेक मनुसिंघवी यांच्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनाही ते लवकरच कळेल, असा चिमटा देखील त्यांनी यावेळी विरोधकांना काढला.
भाजपकडे विकासाचे डॅशिंग रसायन; मुख्यमंत्र्याचे सुप्रिया सुळेंना उत्तर
भाजपच्या मेगा भरतीच्या संदर्भात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केलेल्या 'भाजपकडे असे कोणते वॉशिंग पावडर आहे', या वक्तव्याचा फडणवीसांनी समाचार घेतला. ते म्हणाले, मी आधी सुप्रिया सुळेंचे आभार मानतो. त्यांनी मान्य केले की त्यांच्या पक्षात भ्रष्टाचाराची भरपूर घाण झाली असून वॉशिंगची गरज आहे. भाजपकडे विकासाचे डॅशिंग रसायन आहे. या रसायनापुढे विरोधक निष्प्रभ आहेत, असा टोला त्यांनी सुप्रिया सुळेंना लगावला
एकनाथ खडसे आमचे मार्गदर्शक -
एकनाथ खडसेंच्या बाबतीत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'एकनाथ खडसे आमचे मार्गदर्शक तसेच ज्येष्ठ नेते आहेत', अशी सावध प्रतिक्रिया देत अधिक बोलणे टाळले. खडसेंना आगामी काळात भाजपची सत्ता आल्यावर मंत्रिमंडळात स्थान द्यावे किंवा नाही, त्यांना राज्यात ठेवायचे की केंद्रात दिल्लीत पाठवायचे, याबाबतचा निर्णय मी घेत नाही तर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष घेत असतात. महाराष्ट्रात अनेक वर्षे ते आमच्या पक्षाचे मोठे नेते म्हणून राहिले आहेत. आजही आहेत, असे फडणवीसांनी सांगितले.