जळगाव- काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच देशद्रोह्यांना पाठीशी घालत आले आहेत. देशद्रोह्यांचे स्वागत करणाऱ्या, त्यांना हार-फुले देणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला तुम्ही मतदान करणार आहात का? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अमळनेर येथे केला आहे.
अमळनेर येथील प्रचार सभेत बोलताना मुख्यमंत्री जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार उन्मेष पाटील यांच्या प्रचारार्थ अमळनेरात आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. या सभेला जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार शिरीष चौधरी, स्मिता वाघ, माजी खासदार एम. के. पाटील, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, साहेबराव पाटील आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, आताची निवडणूक ही देशाच्या अस्मितेची निवडणूक आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा जाहीरनामा बघा. राष्ट्रवादीवाले म्हणतात, पाकिस्तानसोबत युद्ध नको तर चर्चा करा. पाकिस्तानने आमची माणसे किड्या, मुंग्यांसारखी मारायची आणि आम्ही त्यांच्याशी चर्चा करायची का? त्यांनी आमचा १ मारला तर आम्ही त्यांचे ४ मारू, असा भारत आता आहे. काँग्रेस तर त्यांच्याही पुढे आहे. ते म्हणतात, की आमचे खिचडीचे सरकार आले, तर आम्ही काश्मीरमधील सैन्य कमी करू, सैन्याचे अधिकार काढून घेऊ. याही पुढे जाऊन ते म्हणतात की, आम्ही देशद्रोहाचे कलम कमी करू, अशा लोकांच्या पाठीशी तुम्ही उभे राहणार का? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.
काँग्रेसच्या चेल्या-चपाट्यांचीच गरिबी दूर झाली -
काँग्रेसने सर्वसामान्यांची गरिबी दूर करण्याचा विश्वास दिला होता. पण काँग्रेसच्या काळात काँग्रेसचे नेते, चमचे आणि चेल्या-चपाट्यांचीच गरिबी दूर झाली, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. ते म्हणाले, की दुराचारी, अनाचारी, अत्याचारी आणि भ्रष्टाचारी अशी प्रकारची संभावना ज्या सरकारची करता येईल, असे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आपण दीर्घकाळ पाहिले. मात्र, मागील ५ वर्षात मोदींच्या नेतृत्वाखाली या देशात परिवर्तन झाले. सर्वसामान्य माणसाच्या जीवनातदेखील परिवर्तन झाले. निवडणुका आल्या की काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले फक्त बोलतात. राहुल गांधी आणि शरद पवार यांची आश्वासने म्हणजे कोंबड्या विकायचा धंदा आहे, अशी खिल्ली देखील फडणवीस यांनी उडवली.
...यांचे चेले-चपाटे काय आमचा मुकाबला करतील -
आता निवडणुकीच्या मैदानात आल्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले आमच्याशी मुकाबला करण्याच्या बाता करत आहेत. राष्ट्रवादी आमच्याशी काय मुकाबला करेल. त्यांच्या कॅप्टनने पायाला पॅड बांधले. म्हणाले, मी ओपनिंगला जातो. म्हाड्यात बॅटिंग करतो. पण सातव्या दिवशी ते १२ वा खेळाडू म्हणून पव्हेलीयनमध्ये बसले. कॅप्टन खेळायला तयार नाही आणि त्यांचे चेले-चपाटे काय आमचा मुकाबला करतील, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर केली.