जळगाव- उत्तर भारतात सुरू असलेल्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यात आज पूर्णतः ढगाळ वातावरण होते. अनेक ठिकाणी पाऊसही झाला. शहरात दुपारनंतर पावसाची रिपरिप सुरू होती. सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. नागरिकांना चक्क पावसाळ्याप्रमाणे रेनकोट, छत्रीचा वापर बाहेर जाण्यासाठी करावा लागला.
१६ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात पावसाचा अंदाज-
उत्तर भारतात परतीचा मॉन्सून सुरू झाल्याचा हा परिणाम आहे. आजपासून ते १६ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने विर्तविला आहे. १६ डिसेंबरनंतर थंडीच्या लाटेची शक्यता असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. कालपासून ढगाळ वातावरण सुरू झाले, असे वातावरण १६ डिसेंबरपर्यंत राहणार आहे. याचा फायदा रब्बीच्या पिकांना होणार आहे. गहू, हरभरा, ज्वारी, दादर आदी एका पाण्यावर येणाऱ्या पिकांना थंडीचा लाभ होईल, अशी माहिती कृषी विभागाने दिली. मात्र, दोन-तीन दिवस सलग ढगाळ वातावरण असल्यास पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव होईल. यामुळे सूर्यप्रकाशाची गरज असल्याचे सांगण्यात आले. ढगाळ वातावरण व पावसामुळे हवेतील गारठा वाढला होता. यामुळे जो-तो गरम कपडे घालूनच बाहेर पडताना दिसत होता.
थंडी, तापाचे रुग्ण वाढीची शक्यता-
हवेतील गारठा वाढल्याने थंडी, सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना थंडीचा अधिक त्रास होतो. थंडीमुळे ज्येष्ठांना अंगदुखी, गुडघे दुखी असे विकार उद्भवतात. सध्या कोरोना संसर्गाची लाट नाही, मात्र संसर्ग सुरू आहे. त्यात सर्दी, खोकला झाल्यास अशा रुग्णांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे, अशी माहिती शहरातील डॉक्टरांनी दिली.