जळगाव- मत्स्य पालन व्यवसायासाठी सरकारकडून मिळणारे सरकारी अनुदान मिळवून देण्यासाठी कागदपत्रांची पुर्तता करुन द्यावी. तसेच उत्कृष्ट अहवाल देण्याच्या मोबदल्यात १० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या मत्स्य विभागाच्या सहाय्यक आयुक्तासह लिपीकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी दुपारी सापळा रचून अटक केली.
हेही वाचा-उरणमधील ओएनजीसीमध्ये पुन्हा वायू गळती; नागरिकांमध्ये घबराट
मत्स्य विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त रमेशकुमार जगनाथ धडील (वय ५५) व लिपीक रणजीत हरी नाईक (वय ४९) असे अटक केलेल्या लाचखोरांची नावे आहे. या प्रकरणातील तक्रारदाराचा मत्स्य व्यवसाय असून त्यांनी वाघूर धरणावर पिंजरा पद्धतीने मत्स्य पालनाचे कंत्राट घेतलेले आहे. या मत्स्य पालन व्यवसायाला मिळणारे सरकारी अनुदान मिळवून देण्यासाठी कागदपत्रांची पुर्तता करुन द्यावी. तसेच उत्कृष्ट अहवाल देण्याच्या मोबदल्यात धडील व नाईक या दोघांनी मंगळवारी त्यांच्याकडे १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक जी. एम. ठाकूर, पोलीस निरीक्षक नीलेश लोधी, संजोग बच्छाव, सुरेश पाटील, मनोज जोशी, प्रशांत ठाकूर, प्रवीण पाटील, नासीर देशमुख, ईश्वर धनगर यांच्या पथकाने बुधवारी दुपारी १ वाजता मत्स्य विभागाच्या कार्यालयाबाहेर सापळा रचला होता. ठरल्याप्रमाणे धडील व नाईक यांनी लाचेची रक्कम स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांच्या विरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोघांच्या घरांची झडती-
या कारवाईनंतर नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडील यांच्या नाशिकातील घरी जाऊन झाडाझडती घेतली. तर जळगावच्या पथकाने नाईक याच्या घरी तपासणी केली. यात काय आढळून आले, या बद्दल गोपनीयता बाळगण्यात आली आहे.