जळगाव- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि सेनेची युती झाली आहे. परंतु, जळगाव जिल्ह्यातील बहुतेक मतदारसंघात तिकीट कापलेल्या भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांनी सेनेच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी केली आहे. असे असताना भाजपचे पक्षश्रेष्ठी कोणताही हस्तक्षेप करत नसल्याने सेनेचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेपूर्वी संताप व्यक्त केला. यावेळी त्यांची समजूत काढण्यासाठी आलेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी यांच्यात जोरदार खटके उडाले.
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी जळगावात राज्यातील प्रचाराची पहिली सभा घेतली. या सभेपुर्वीच गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. भाजपच्या बंडखोर उमेदवारांच्या विषयावर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलू द्यावे, अशी मागणी गुलाबराव पाटलांनी केली. मात्र, ही बाब सभेच्या प्रोटोकॉल विरोधात असल्याने गिरीश महाजनांनी विरोध केला. त्यामुळे गुलाबराव चांगलेच भडकले.
हेही वाचा -'विरोधक आता थकलेत, त्यांना उभं राहायलाही आधार लागतोय'