जळगाव- किनोद गावच्या तापी नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपसाविरोधात सोमवारी ग्रामस्थांनी एल्गार पुकारत तब्बल १२ ट्रॅक्टर जप्त केले. ट्रॅक्टर जप्त केल्याची माहिती ग्रामस्थांनी महसूल प्रशासनाला कळविल्यानंतरही २ तासांहून अधिक काळ महसूलचे अधिकारी घटनास्थळी आले नाहीत. त्यामुळे वाळूमाफिया आणि ग्रामस्थांमध्ये किरकोळ वाद झाला. मात्र, उशिराने तहसीलदार वैशाली हिंगे यांच्या पथकाने घटनास्थळी येत सर्व ट्रॅक्टर जप्त केले.
किनोदच्या ग्रामस्थांनी पकडले अवैध वाळू उपसा करणारे १२ ट्रॅक्टर चोपडा तालुक्यातील सुटकार गावाच्या तापी नदी पात्रातील वाळू उपसासाठी ३ गटांना ठेका देण्यात आला आहे. मात्र, काही महिन्यांपासून वाळू माफियांकडून या अधिकृत ठेक्यावरून वाळू उपसा न करता किनोद, सावखेडा, भादली या भागातील नदीपात्रातून अवैध उपसा केला जात आहे. याबाबत या तिन्ही गावांच्या ग्रामस्थांनी महसूल प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रार केली. त्यानंतरदेखील प्रशासनामार्फेत वाळूमाफियांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी नदीपात्रात जाऊन वाळू उपसा रोखण्याचा प्रयत्न केला.
सोमवारी किनोद येथील काही ग्रामस्थ दशक्रिया विधीसाठी नदीपात्रात गेले होते. विधी आटोपल्यानंतर नदीपात्रात सुमारे ५० हून अधिक ट्रॅक्टर व डंपरव्दारे वाळू उपसा होत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यानंतर ग्रामस्थांनी ट्रॅक्टर पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही डंपर चालकांनी नदीपात्रातून पळ काढला. तर ग्रामस्थांनी १२ ट्रॅक्टरच्या टायरची हवा काढत हे ट्रॅक्टर जप्त केले. ग्रामस्थांनी या घटनेची माहिती तहसीलदार वैशाली हिंगे यांना फोनवरून दिली. मात्र, २ तास झाले तरी कोणताही प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाला नव्हता. त्यामुळे काही वाळू माफियांनी ग्रामस्थांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जवळपास ११.३० वाजायच्या सुमारास तहसीलदार वैशाली हिंगे या आपल्या पथकासमवेत घटनास्थळी पोहचल्या. आणि त्यांनी ग्रामस्थांनी पकडलेले १२ ट्रॅक्टर जप्त केले.
वाळूमाफियांचे अधिकाऱ्यांशी लागेबांधे-
जिल्ह्यात वाळूमाफियांनी अक्षरशः हैदोस घातला आहे. ज्या गटांचा ठेका देण्यात आलेला नाही, तेथूनही सर्रासपणे वाळू उपसा सुरू आहे. यासंदर्भात तक्रारी केल्यानंतरही महसूल प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. वाळूमाफियांचे महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांशी लागेबांधे असल्याने ग्रामस्थांकडून होणाऱ्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या जात नाहीत.