जळगाव -शहरासह जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाचा वेग कायम आहे. आता तर जिल्ह्याचा मृत्यूदरही वाढत चालला आहे. एकीकडे अशी भयावह परिस्थिती असली तरी जळगावात नागरिकांना कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नसल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाची साखळी खंडित व्हावी, म्हणून राज्य शासनाने कडक निर्बंध घातले आहेत. मात्र, बेफिकीर जळगावकरांनी हे निर्बंध अक्षरशः धाब्यावर बसवले आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या बहाण्याने नागरिक अगदी बिनधास्तपणे घराबाहेर रस्त्यांवर हिंडत आहेत. यावर उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने आता जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी वेळेची मर्यादा घालून दिली आहे. सकाळी 7 ते 11पर्यंत बाजारपेठेत खरेदी करता येणार आहे. पहिल्याच दिवशी नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी बाजारपेठेत आल्याचे पाहायला मिळाले.
कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर जळगाव जिल्ह्यात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून रुग्णसंख्येचा आलेख वाढू लागला आहे. काही दिवसांपूर्वी दोन आकडी असलेली अॅक्टिव्ह रुग्णसंख्या महिनाभरातच साडेअकरा हजारांच्या पार गेली आहे. मृत्यूदरही अचानक वाढला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात दररोज सरासरी एक हजार किंवा त्यापेक्षा अधिक नवे बाधित रुग्ण समोर येत आहेत. दररोज किमान 20 रुग्णांचा बळी जात आहे. दुसऱ्या लाटेत बाधित होणाऱ्यांमध्ये तरुणांचे प्रमाण वाढले आहे. असे असले तरी जळगावकर नागरिक मात्र अगदी बिनधास्तपणे वावरत असल्याचे दिसून येत आहे.
म्हणून घातली वेळेची मर्यादा-
कोरोनाचा वाढत जाणारा संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील अनेक शहरांमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी दररोज मर्यादित वेळ दिला जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी याच धर्तीवर जळगावात देखील उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दूध, किराणा माल अशा प्रकारच्या खरेदीसाठी प्रशासनाने सकाळी 7 ते 11 पर्यंत अशी 4 तास मुभा दिली आहे.