जळगाव -भारत आणि चीनचे राजकीय संबंध ताणल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकारने दीडशेहून अधिक चिनी मोबाईल अॅपवर नुकतीच बंदी घातली. या अॅपद्वारे चीन सरकार भारतीयांचा महत्त्वपूर्ण डेटा चोरत असल्याची शंका होती. परंतु, चिनी अॅपवर बंदी घातल्यानंतरही भारतात बंदी असलेले काही चिनी मोबाईल अॅप सर्रासपणे वापरले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात अनेक अॅप हे गेमिंग तर काही अॅप हे डेटा शेअरींग प्रकारातील आहेत.
भारतात चिनी अॅपवर बंदी घालण्यात आल्यानंतर सध्या त्यांचा भारतातील वापर हा चीनऐवजी दुसऱ्या देशांचे सर्व्हर वापरत आहेत. 'थर्ड पार्टी सर्व्हर युजिंग'मुळे भारतीयांचा महत्त्वपूर्ण डेटा चीनसह इतर देश सहज चोरू शकतात, अशी भीती सायबर तज्ज्ञांनी वर्तवली आहे. खबरदारी म्हणून भारतात बंदी असलेले अॅप न वापरणे हेच हिताचे आहे.
केंद्र सरकारने बंदी घातलेल्या अॅपमध्ये शेअर इट, टीकटॉक व पबजी हे अॅप व गेम भारतात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होते. याशिवाय इतरही चिनी अॅप भारतीयांच्या पसंतीला उतरले होते. त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू होता. परंतु, भारतात चिनी अॅपवर बंदी आल्यानंतर प्ले स्टोअर, अॅप स्टोअरवरून ते 48 तासांच्या आत हटवण्यात आले. त्यानंतर सायबर क्षेत्रातील हॅकर्सनी आपली शक्कल लढवत बंदी असलेले अॅप वापरासाठी पळवाट सोडून काढली. बंदी असलेले अॅप वापरता यावेत, म्हणून चीन देशाचे युजिंग सर्व्हर न वापरता दुसऱ्याच देशाचे सर्व्हर वापरणे सुरू झाले. यासाठी काही दुसरे अॅप डाऊनलोड केले जात आहेत. हॅकर्सनी ही पळवाट शोधून काढल्याने अनेक चिनी अॅप वापरता येत आहेत. तंत्रज्ञान क्रांतीमुळे घराघरात आता मोबाईल पोहचला आहे. त्यामुळे मुंबई, पुणे यासारख्या महानगरांमध्येच नाही तर अगदी ग्रामीण भागातील व्यक्तीच्या मोबाईलमध्ये बंदी असलेले चिनी अॅप सुरू झाले आहेत. त्यामुळे भारतीयांचा महत्त्वपूर्ण डेटा असुरक्षित असल्याची बाब सायबर तज्ज्ञांच्या लक्षात आली आहे.
काय आहे भीती-
भारतात बंदी असलेले चिनी अॅप वापरता यावेत म्हणून हॅकर्सनी एक शक्कल लढवली आहे. भारतातील अनेक हॅकर्स चीनऐवजी अन्य देशांचे म्हणजेच फिलिपिन्स, अमेरिका, इंडोनेशिया या देशांच्या सर्व्हरच्या माध्यमातून चिनी अॅप वापरत आहेत. अशा पद्धतीने टिकटॉक, शेअर इट तसेच पबजी हे गेमिंग अॅप मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे. अशा पद्धतीने अन्य देशांच्या सर्व्हरचा वापर करून चिनी अॅप डाऊनलोड करणे, वापरणे धोकेदायक ठरू शकते. परंतु, याचा विचार न करता सर्रासपणे अॅप वापरणे सुरू आहे.
चीनसह इतर देश चोरू शकतात भारतीयांची माहिती-
भारत सरकारने चिनी अॅपवर बंदी आणण्याचे मुख्य कारण म्हणजे, भारतीयांचा डाटा चिनी सरकारला उपलब्ध होत होता. त्या अनुषंगाने, जर आता हेच अॅप अन्य सर्व्हरवरून डाऊनलोड केले जात असतील तर या अॅपची निर्मिती करणाऱ्या चिनी कंपनीसह चीनचे सरकार तसेच अॅप डाऊनलोड करण्यासाठी ज्या देशातील सर्व्हरचा वापर भारतीय युवक करत आहेत; त्या देशाला व ते अॅप बनवणाऱ्या कंपनीला देखील भारतीयांचा सुरक्षित माहितीचा डाटा उपलब्ध होत आहे. बंदी नसताना केवळ अॅप बनवणाऱ्या चिनी कंपन्या व चीन सरकार भारतीयांची माहिती चोरत होते. मात्र, आता तिसऱ्या कंपनीच्या माध्यमातून हा गेम डाऊनलोड होत असल्याने तिसरी कंपनीही भारतीयांच्या म्हणजे युजर्सचा डेटा चोरण्याची शक्यता आहे.