जळगाव -जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील एका दाम्पत्याने आपल्या अडीच वर्षांच्या मुलीसह रेल्वेखाली झोकून देऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये रेल्वेच्या धडकेत आई व मुलगी जागीच ठार झाली, तर पती गंभीर जखमी झाला आहे. आज (बुधवारी) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
जळगावात दाम्पत्याचा मुलीसह रेल्वेखाली आत्महत्येचा प्रयत्न; माय-लेकी ठार, पती जखमी - जळगाव दाम्पत्य आत्महत्या न्यूज
भुसावळ तालुक्यात एका दाम्पत्याने आपल्या अडीच वर्षांच्या मुलीसह रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. या अपघाताची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, आई व मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्याची तयारी करण्यात येत आहे.
साकेगाव येथील रहिवासी हरीश शिरीष चौधरी (वय 36) यांनी आपली पत्नी आणि अडीच वर्षांच्या मुलीसह रेल्वेखाली झोकून देऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यात त्यांची पत्नी आणि मुलगी जागीच ठार झाले, तर हरीश चौधरी हे गंभीर जखमी झाले आहेत. आज सकाळी नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. ही बाब परिसरातून जाणार्या लोकांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी तातडीने गावातील लोकांना या घटनेबाबत माहिती दिली. गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी अवस्थेत असणार्या हरीश चौधरी यांना उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. मात्र, त्यांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, आई व मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्याची तयारी करण्यात येत आहे. हा आत्महत्येचाच प्रकार असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आली आहे. परंतु, चौधरी कुटुंबाने इतके टोकाचे पाऊल कशासाठी उचलले? याची माहिती अद्याप मिळालेली नाही. पुढील तपास भुसावळ पोलीस करत आहेत.