जळगाव -राज्यातील मागील भाजपा व विद्यमान महविकास आघाडी सरकारने मराठा समाजाचा केवळ मतांसाठी वापर केला आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार व केंद्र सरकार एकमेकांकडे बोट दाखवत आहे. दोघांच्या राजकारणामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही. यापुढे आरपार की लढाई असेल. मराठा समाज मूक मोर्चा काढणार नाही तर, हातात दंडूके घेवून ठोक मोर्चा काढेल, असा इशारा अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी दिला आहे. अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने राज्याचा दौरा केला जात आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने ते आज (शुक्रवारी) जळगावात आलेले होते. नूतन मराठा महाविद्यालयात बैठकीपूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे
'आता आरपार की लढाई लढावी लागणार'
जावळे पाटील पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात कमी पडले. राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखविते, केंद्र सरकार राज्याकडे बोट दाखविते आणि दोन्ही सरकार न्यायालयावर बोट ठेवतात. राज्य व केंद्र सरकारने एकत्र बसून मराठा समाजाला आरक्षण कसे देता येईल, यासाठी मार्ग काढला पाहिजे. मात्र, दुर्दैवाने तसे होत नाही. आजवर मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने लढा सुरू ठेवला आहे. तरीही आमच्या पदरात आरक्षण मिळत नसेल तर आरपार की लढाई लढावी लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
'...तर गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही'
मराठा समाजाकडून सध्या राज्याचा दौरा सुरू आहे. हा दौरा झाल्यानंतर २५ ऑगस्ट रोजी पुणे येथे बैठक आहे. त्याठिकाणी आंदोलनाचा निर्णय घेतला जाईल. तारीख देखील निश्चित केली जाणार आहे. त्यानुसार मातोश्री किंवा मंत्रालयावर मोर्चा काढणार आहोत. मोर्चासाठी प्रत्येक जिल्ह्यातून १० हजार मराठा बांधव येतील. ३ ते ४ लाखाचा मोर्चा काढणार आहे. त्यावेळी आम्हाला गोळ्या घातल्या तरी मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही, अशी माहितीही जावळे पाटील यांनी दिली.
'जगावं की मरावं अशी मराठा समाजाची अवस्था'
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ज्यांनी आत्महत्या केली, अशा लोकांच्या ४५ कुटुंबीयांना देखील न्याय मिळालेला नाही. तसेच कोपर्डी घटनेतील आरोपीच्या फाशीच्या शिक्षेची देखील अंमलबजावणी झालेली नसल्याबद्दल देखील पाटील यांनी संताप व्यक्त केला. जगावं की मरावं अशी मराठा समाजाची अवस्था झाली आहे. त्यामुळे सरकारने याचा विचार करावा, अथवा मराठा समाज मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, मराठा समाज निवडणूक लढणार नसला तरी ज्या ज्या पक्षांनी आरक्षणाला विरोध केला. त्यांना निवडणुकांमध्ये पाडण्याचे काम आम्ही करणार असल्याचा इशाराही शेवटी नानासाहेब जावळे पाटील यांनी दिला.