जळगाव - रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमीष देत पिता-पुत्राने एका महिलेस सात लाख रुपयांत गंडवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी ठाण्यात पिता-पुत्राविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोहर वामन पाटील व आकाश मनोहर पाटील (रा. वडगाव, ता. रावेर) अशी दोघांची नावे आहेत.
योगिता ऋषीकेश खैरनार (वय ४०) रा. न्यु सम्राट कॉलनी, यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांना वर्षा व श्वेता या दोन मुली असुन दोघी सध्या बेरोजगार आहेत. श्वेताचा मित्र आकाश याचे वडील रेल्वेत टीसी पदावर कार्यरत आहेत. २०१८ मध्ये त्याने वर्षाला रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमीष योगिता यांना दिले. त्याच्या बोलण्यात येऊन योगिता यांनी आकाशला सुरूवातीला फॉर्म भरण्यासाठी १० हजार रुपये दिले. यानंतर आकाश व त्याच्या वडीलांनी वेळोवेळी करुन योगिता यांच्याकडून सात लाख रुपये घेतले. मधल्या काळात आकाशने एक बनावट जॉईनिंग लेटर देखील बनवून देखील दिले. परंतु, वर्षाने रुजू होण्याच्या आधीच ‘कुणीतरी फोन लावल्याने आता रुजू करता येणार नाही’ अशी थाप मारली. नोकरी न मिळाल्याने योगिता यांनी आकाशकडे पैसे परत मागण्याचा तगादा लावला. मात्र, आकाशने पैसे देण्यास नकार दिला व पैसे परत मागितल्यास जीवाचे बरेवाईट करुन घेईल अशी धमकीही दिली.