जळगाव -राज्यात गाजलेल्या बीएचआर गैरव्यवहारप्रकरणी पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (दि. 23) न्यायालयात पाच संशयितांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. यात 61 कोटी 90 लाख 88 हजार 163 रुपयांची फसवणूक, अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. हे दोषारोपपत्र सुमारे अडीच हजार पानांचे आहे.
बीएचआर पतसंस्थेत अवसायकाच्या काळात झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी पुण्यातील डेक्कन, आळंदी व शिक्रापूर या तीन पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. यातील डेक्कन पोलीस ठाण्यात रंजना घोरपडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दाखल गुन्ह्यात पोलिसांनी 89 व्या दिवशी तपास पूर्ण करुन अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एस गोसावी यांच्या न्यायालयात दोषारोप सादर केले. यात सीए महावीर जैन, विवेक ठाकरे, धरम सांखला, कमलाकर कोळी व सुजित वाणी या पाच जणांविरुद्ध दोषारोप सादर करण्यात आले आहे. यातील कमलाकर कोळी हा जामिनावर बाहेर आला आहे. तर उर्वरित चारही जण सध्या पुण्याच्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. दोषारोपपत्र सादर करतेवेळी सरकारी वकील प्रवीण चव्हाण, आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके, पोलीस निरीक्षक सुचिता खोकले, त्रयस्त अर्जदार अॅड. अक्षता नायक उपस्थित होते.