जळगाव- जिल्ह्यातील किती शेतकरी कृषी कर्ज घेऊन त्याची बँकेत ‘एफडी’ करतात, असा वादग्रस्त सवाल खुद्द राज्याचे महसूल तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. ते दुष्काळाची पाहणी करण्यासाठी जळगावमध्ये आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कृषी आढावा बैठकीत त्यांनी हा वादग्रस्त सवाल केल्यानंतर उपस्थित सर्वच अधिकारी अवाक् झाले होते.
महसूलमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटलांनी असा अजब सवाल करत दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया सर्वस्तरातून उमटत असून ते या वक्तव्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. चंद्रकांत पाटील हे शनिवारी दुष्काळी पाहणीसाठी जिल्हा दौऱ्यावर आले असताना, संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात त्यांनी कृषी आढावा घेण्यासाठी बैठक घेतली.