महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपचे शनिवारी चक्काजाम आंदोलन; खासदार रक्षा खडसेंची माहिती

२६ जून रोजी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्दावर भाजपकडून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहेत. यासाठी जिल्ह्याचे नेतृत्व खासदार रक्षा खडसे यांच्याकडे देण्यात आले असून, या आंदोलनाची माहिती देण्यासाठी गुरुवारी ब्राह्मण सभेत झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार खडसे बोलत होत्या.

रक्षा खडसे
रक्षा खडसे

By

Published : Jun 25, 2021, 9:41 AM IST

जळगाव -ओबीसी आरक्षणप्रश्नी राज्य शासनाने केलेल्या हलगर्जीपणाच्या विरोधात भाजपकडून शनिवारी सकाळी ११ वाजता जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजप खासदार रक्षा खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेआधी आंदोलनाच्या नियोजनासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला.

२६ जून रोजी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्दावर भाजपकडून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहेत. यासाठी जिल्ह्याचे नेतृत्व खासदार रक्षा खडसे यांच्याकडे देण्यात आले असून, या आंदोलनाची माहिती देण्यासाठी गुरुवारी ब्राह्मण सभेत झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार खडसे बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे, भाजपचे उत्तर महाराष्ट्र संघटन प्रमुख डॉ.राजेंद्र फडके, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, आमदार संजय सावकारे, माजी आमदार स्मिता वाघ, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष पी. सी. पाटील आदी उपस्थित होते.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपचे शनिवारी चक्काजाम आंदोलन..

मेळाव्यात भाजप नेत्यांचे महाविकास आघाडीवर टीकास्त्र-

मेळाव्यात मार्गदर्शन करताना आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले की, राज्यातील आघाडी सरकार हे आघाडी नसून बिघाडी सरकार आहे. जनतेच्या प्रश्नावर हे सरकार दूर पळत असून, आता अधिवेशन देखील केवळ दोनच दिवस घेतले जाणार आहे. मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर या सरकारला न्यायालयात आपली बाजू मांडण्यास अपयश आले असून, ते अपयश झाकण्यासाठीच दोन दिवसात अधिवेशन गुंडाळण्याचा घाट बिघाडी सरकारने केला असल्याचा आरोप सुरेश भोळे यांनी केला. तर राज्यातील आघाडी सरकार हे जनतेच्या दृष्टीने करंटे सरकार असून, मराठा समाजावर अन्याय केल्यानंतर आता ओबीसी समाजावर देखील या सरकारने अन्याय केला आहे, असे मत माजी आमदार स्मिता वाघ यांनी मांडले. आमदार संजय सावकारे यांनीही भूमिका मांडली.

पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या टीकेला रक्षा खडसेंनी दिले उत्तर-

हवामानावर आधारित फळपीक विम्याचा निकषात राज्य शासनाने बदल केले होते. यामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी अडचणीत येणार होते. त्याविरोधात भाजपने आंदोलन केल्यामुळे राज्य शासनाला हे निकष पुन्हा बदलवावे लागले. यामध्ये कोणीही श्रेय घेत नसून, शेतकऱ्यांचा प्रश्न आम्ही मांडला. पालकमंत्री गुलाबराव पाटील हे माझ्या वडिलांसारखे असून, त्यांनी या मुद्द्यावर मी चांगले काम केले म्हणून प्रोत्साहन देण्याची गरज होती. मात्र, त्यांनी टीका केली, अशा शब्दांत खासदार रक्षा खडसे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. केळी पीक विम्याचे निकष हे राज्य शासनाने बदलले होते. मात्र, त्यावेळीही शिवसेना व इतर पक्षातील नेत्यांनी केंद्रावर खापर फोडले. आता याप्रश्नी राज्य शासनाला माघार घ्यावी लागली व पुन्हा जुने निकष लागू केले. आता सेनेच्या नेत्यांकडून हे जुने निकष पुन्हा राज्य शासनाने आणले असे सांगत श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, जेव्हा निकष हटविले जातात तेव्हा केंद्र सरकार जबाबदार आणि हेच निकष पुन्हा आणले जातात, तेव्हा राज्य शासनाने केले असल्याचे सांगितले जाते. मात्र, खरे काम कोणी केले याची जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्ण माहिती आहे. त्यामुळे कोणी कितीही श्रेय घेतले तरी काहीही फायदा नाही, असेही रक्षा खडसे यांनी यावेळी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details