जळगाव- पंतप्रधानपदाच्या उमेदवारीच्या विषयावरून भाजपकडून महाआघाडीवर होणाऱ्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज जळगावात जोरदार प्रत्युत्तर दिले. महाआघाडीकडे पंतप्रधानपदासाठी अनेक चांगले उमेदवार आहेत. राहुल गांधी, शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात. ममता बॅनर्जी किंवा मायावती हे पण पर्याय आहेत. तुमच्यापेक्षा चांगले काम करणारे मनमोहनसिंगदेखील आमच्याकडे आहेत, असे सांगून भुजबळ यांनी मोदींच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
जळगाव लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ आज जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कोळगाव येथे प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी भुजबळ बोलत होते. सभेला उमेदवार गुलाबराव देवकर, आमदार डॉ. सतीश पाटील, माजी खासदार अॅड. वसंतराव मोरे, माजी आमदार दिलीप वाघ, राजीव देशमुख आदी उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले, की या देशात मोदींच्या विरोधात प्रवाह वाहत आहे. काहीही झाले तरी आता मोदी सरकार या देशात येणार नाही. त्यानंतर राहुल गांधी, शरद पवार, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, मायावती असे सारे एकत्र येऊन या देशाचा पंतप्रधान कोण होईल ते ठरवतील. पण मोदी म्हणतात की तुमचा पंतप्रधान कोण आहे ते आधी सांगा. आमच्याकडे पंतप्रधानपदासाठी अनेक चांगले उमेदवार आहेत, असे छगन भुजबळ यावेळी म्हणाले.