जळगाव -जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला आहे. दररोज बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा १३ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, हा रेट कमी करण्यासाठी व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्याच्या सूचना केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या त्रिसदस्यीय विशेष पथकाने बुधवारी जळगाव जिल्हा आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्या; केंद्रीय पथकाच्या जळगाव जिल्हा आरोग्य यंत्रणेला सूचना जळगाव जिल्ह्यातील रुग्णसेवेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय तपासणी पथकाने बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भेट दिली. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी पथकाचे स्वागत केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भीमाशंकर जमादार उपस्थित होते.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्या; केंद्रीय पथकाच्या जळगाव जिल्हा आरोग्य यंत्रणेला सूचना यांचा होता पथकात समावेश -
केंद्रीय तपासणी पथकात दिल्ली येथील डॉ. पी. रवींद्रन, डॉ. सुनील खापर्डे, डॉ. संकेत कुलकर्णी, डॉ. प्रदीप आवटे यांचा समावेश होता. त्यांनी अधिष्ठाता दालनात अधिकाऱ्यांशी संवाद साधला. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी रुग्णालयातील कोरोना रुग्णांची माहिती दिली. त्यांना पुरविल्या जाणाऱ्या सोयी सुविधा पाहून पथकातील सदस्यांनी समाधान व्यक्त केले. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता तालुक्यातील सर्व केंद्रांवर कोविड केअर सेंटर सुरू करावे व लक्षणे नसलेल्या रुग्णांना जागेवरच उपचार द्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
कंटेन्टमेंट झोनची केली पाहणी-
जिल्हा रुग्णालयातील आढावा घेतल्यानंतर केंद्रीय पथकाने शहरातील अयोध्यानगर व कुसुंबा येथे असलेल्या दोन कंटेन्टमेंट झोनची पाहणी केली. पाहणीअंती पथकाने आवश्यक त्या खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्या; केंद्रीय पथकाच्या जळगाव जिल्हा आरोग्य यंत्रणेला सूचना जिल्हा शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद कोरोनाबाधित -
जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अहवाल येण्यापूर्वी आज (बुधवारी) सकाळी डॉ. रामानंद हे रुग्णालयात पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय तपासणी समितीसोबत असल्याने खळबळ उडाली आहे. बुधवारी सकाळपासून अधिष्ठाता डॉ. रामानंद यांना घसा दुखण्याचा त्रास होत होता. त्यांनी तात्काळ खबरदारी म्हणून आरटीपीसीआर चाचणी करून घेतली. दुपारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्या छातीचा सिटीस्कॅन नॉर्मल असून आवश्यक ते उपचार अधिष्ठाता यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे रुग्णालय प्रशासनाने कळविले आहे. दरम्यान, अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी अहवाल येण्यापूर्वी सकाळी रुग्णसेवेचा आढावा घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय तपासणी समितीचे स्वागत केले. समितीसोबतच पाहणी दरम्यान देखील ते सोबतच होते. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासह इतर अधिकारी देखील उपस्थित होते. आता अधिष्ठाता डॉ. रामानंद यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.