महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाच्या वाढत्या मृत्यूदराच्या पार्श्वभूमीवर जळगावात केंद्रीय समितीकडून चाचपणी - देशातील सर्वाधिक मृत्यूदर असलेले शहर कोणते?

जळगाव जिल्ह्यात सतत होणारी कोरोनाग्रस्तांची वाढ व देशातील सर्वाधिक मृत्यूदर या पार्श्वभूमीवर केंद्राकडून द्विसदस्यीय समिती पाहणी करण्यासाठी जळवागात आली होती. यावेळी त्यांनी पाहणी करुन योग्य त्या सुचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत.

visit photo
पाहणी दरम्यानचे फोटो

By

Published : Jun 21, 2020, 10:31 AM IST

जळगाव -जिल्ह्यात कोरोनाचा दिवसेंदिवस वाढत जाणारा संसर्ग आणि मृत्यूदराची चाचपणी करण्यासाठी शनिवारी (दि. 20 जून) केंद्रीय समिती जळगावात दाखल झाली होती. दोन सदस्यांच्या समावेश असलेल्या या समितीने जिल्हाधिकारी तसेच आरोग्य यंत्रणेच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठका, कोव्हिड रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट तसेच शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांना भेट देऊन जळगावातील परिस्थिती जाणून घेतली. या समितीकडून दौऱ्याचा सविस्तर अहवाल केंद्राला सादर केला जाणार आहे.

बोलताना डॉ. एस.जी. खापर्डे

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने दोन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. दुसरीकडे, जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूदरदेखील देशात सर्वाधिक आहे. दीडशेहून अधिक रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने बळी गेला आहे. जिल्ह्यातील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने ही परिस्थिती उद्भवण्यामागे नेमकी काय कारणे आहेत? याचा आढावा घेण्यासाठी केंद्राकडून जिल्ह्यात एक द्विसदस्यीय समिती पाठविण्यात आली आहे. या समितीत केंद्रीय आरोग्य समितीचे सदस्य तथा आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे वरिष्ठ प्रादेशिक संचालक (पुणे) डॉ. अरविंद अलोने आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. एस. डी. खापर्डे यांचा समावेश आहे.

जळगावात दाखल झाल्यानंतर समितीच्या सदस्यांनी सुरुवातीला जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या दालनात आरोग्य यंत्रणेच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, प्रशासक डॉ. बी.एन. पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय बिराजदार, डॉ. मारूती पोटे, डॉ. मधुकर गायकवाड, नोडल अधिकारी डी. आर. लोखंडे आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थितीत, वाढता संसर्ग तथा मृत्यूदर रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना याबाबतची सखोल माहिती जाणून घेतली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीनंतर समितीच्या सदस्यांनी कोव्हिड रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयातील अतिदक्षता विभाग, कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार होणारे वॉर्ड, संशयित रुग्णांना क्वारंटाईन करण्यात येणारे वॉर्ड तसेच कोरोना चाचणी ज्याठिकाणी होतात, त्या प्रयोगशाळेत देखील प्रत्यक्ष जाऊन पाहणी करत नोंदी घेतल्या. जळगावातील कोव्हिड रुग्णालयात कोरोनाला अटकाव घालण्यासाठी केंद्राच्या निर्देशानुसार उपाययोजना होतात किंवा नाही, स्थानिक प्रशासनाची भूमिका याची माहिती समितीच्या सदस्यांनी घेतली. अधिष्ठाता यांच्या दालनात झालेल्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण सूचना देखील त्यांनी आरोग्य यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना केल्या.

प्रतिबंधित क्षेत्राला भेट देत केली पाहणी

आढावा बैठका आणि कोव्हिड रुग्णालयात पाहणी केल्यानंतर समितीच्या सदस्यांनी जळगावातील प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या नवल कॉलनीत प्रत्यक्ष भेट दिली. त्याठिकाणी किती रुग्ण आढळले, पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील किती जणांना खबरदारी म्हणून क्वारंटाईन केले? याची माहिती जाणून घेतली. यावेळी आरोग्य यंत्रणेच्या बेपर्वाईचे एक उदाहरण समोर आले. नवल कॉलनीत 12 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर आरोग्य यंत्रणेने रुग्णांच्या संपर्कात असणाऱ्या येथील केवळ 22 जणांच्या चाचण्या केल्याची बाब समोर आली. त्यावर समितीच्या दोन्ही सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 12 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने किमान दीडशे जणांच्या चाचण्या अपेक्षित होत्या. मात्र, अवघ्या 22 चाचण्या झाल्याने केंद्रीय पथकाने नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. यापुढे असे होता कामा नये, अशा कडक शब्दांत सूचनाही केल्या. कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी रुग्णांचा शोध घेणे महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा -

ABOUT THE AUTHOR

...view details